‘आषाढी वारी २०२५’दरम्यान अपघातग्रस्त वारकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत!

admin 2 Min Read
2 Min Read

– महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मृत्यू, अपंगत्व किंवा इस्पितळात उपचार घेतलेल्या वारकऱ्यांना ₹४ लाखांपर्यंतची मदत मंजूर!

मुंबई/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – पंढरपूर आषाढी वारी २०२५ दरम्यान अपघात, आपत्ती किंवा अन्य दुर्घटनेत मृत्यू अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या ०१ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, यावर्षीच्या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना विशिष्ट निकषांनुसार आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. वारीचा कालावधी १६ जून ते १० जुलै २०२५ असा असून, या कालावधीत झालेल्या दुर्घटनांवर ही योजना लागू राहणार आहे.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी/सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या, खून, विषप्रयोग यावर ही योजना लागू होणार नाही. केवळ अपघात, दुर्घटना आणि नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यू अथवा जखमी होण्याच्या घटना यांतच मदत देण्यात येणार आहे.

  • अपघाताने मृत्यू झाल्यास निकटवर्तीय वारसाला ₹4,00,000/-
  • ४०% ते ६०% अपंगत्व ₹74,000/-
  • ६०% पेक्षा अधिक अपंगत्व ₹2,50,000/-
  • इस्पितळात ८ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी दाखल ₹16,000/-
  • ८ दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी दाखल ₹5,400/-

मदतीसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया:

  • 1. संबंधित वारकरीने २०२५ च्या आषाढी वारीस पंढरपूरला उपस्थित राहिल्याचे तहसीलदाराचे प्रमाणपत्र अनिवार्य.
  • 2. मृत्यू किंवा अपघाताचे वैद्यकीय प्रमाणपत्र/मृत्यू प्रमाणपत्र जोडावे.
  • 3. वारकरी अथवा त्याचे वारस जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा.
  • 4. जिल्हाधिकारी हे या मदतीसाठी अधिकृत प्राधिकृत अधिकारी असून, संबंधित प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर मदत मंजूर व वितरित करण्यात येईल.

या योजनेचा खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (State Disaster Response Fund) अंतर्गत, मागणी क्र.६, लेखाशिर्ष २२४५ अंतर्गत केला जाणार आहे. वारी संपल्यानंतर (१० जुलै २०२५) ३० जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील अर्ज व मदतीच्या तपशिलासह अहवाल शासनास सादर करणे आवश्यक आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक: 202507011650208019 असा आहे. हा आदेश डिजिटली स्वाक्षरीत असून संजय इंगळे, सहसचिव महसूल व वन विभाग यांनी यावर स्वाक्षरी केली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत काळाची गरज लक्षात घेऊन करण्यात आला आहे. वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देणारी ही योजना श्रद्धेप्रमाणे संवेदनशीलतेचा संगम आहे. शासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांवरून स्वागत होत आहे.

Share This Article
Exit mobile version