पावसाळ्याचे दिवस पाहता, तीन महिन्यांच्या मोफत धान्याचे एकत्रित वितरण सुरू!

admin 3 Min Read
3 Min Read

– मेहकर तालुक्यातील ४५ हजार शिधापत्रिकाधारकांना लाभ; अंत्योदय योजनेतील दीड लाखाचे वर लाभार्थी!
– हक्काचे धान्य विकू नका, अन्यथा, शिधापत्रिका होणार रद्द; विकत घेणाराचीही खैर नाही!
– तहसीलदार नीलेश मडके व निरीक्षण अधिकारी नाहुषकुमार बोराडे अ‍ॅक्शन मोडवर!

मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – पावसाळ्याचे दिवस पाहता, शासनाकडून तीन महिन्याच्या मोफत धान्याचे एकाचवेळी वितरण सुरू आहे. सदर धान्याचा मेहकर तालुक्यातील ४५ हजाराच्यावर शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार असून, एकट्या अंत्योदय योजनेतील दीड लाखाच्यावर लाभार्थी आहेत. दरम्यान, सदर धान्याची काही रेशन कार्ड धारकांकडून विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या धान्याची विक्री केल्याचे आढळून आल्यास सदर लाभार्थ्याची शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, त्याचसोबत धान्य विकत घेणारावरसुध्दा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके व निरीक्षण अधिकारी नाहुषकुमार बोराडे यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा तसेच अंत्योदय योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विनामूल्य तांदूळ व गव्हाचे वितरण करण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पुरवठा विभागाची असून, मेहकर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून प्राधान्य व अंत्योदय योजनेतील रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येते. सदर धान्य वाटप योग्य पद्धतीने करण्यासाठी पुरवठा विभागाकडून ई-पॉस मशीनचादेखील उपयोग करण्यात येतो. ई-पॉश मशीनवर लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा घेतल्याशिवाय धान्य वाटप होत नाही. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस पाहता, शासनाच्यावतीने, जून, जुलै व ऑगस्ट २०२५ या तीन महिन्याचे मोफत धान्य एकत्रित देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित रेशन दुकानामध्ये सदर धान्यसाठा उपलब्ध असून, काही दुकानांना धान्य पाठवणे सुरू आहे. सदर मोफत धान्य वाटप १ जूनपासून सुरूदेखील करण्यात आले आहे. मेहकर तालुक्यातील १७४ रेशन दुकानामार्फत ४५ हजार शिधापत्रिका धारकांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये अन्नसुरक्षा योजनेचे १ लाख ६६ हजार १८८ लाभार्थी असून, अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकेनुसार लाभ देण्यात येतो. परंतु काही शिधापत्रिका धारक हे सदर धान्य विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, काही जण सदर धान्याची अवैधरित्या खरेदी करून वाहतूक करत, अवैधरित्या साठवणूकदेखील करीत आहेत, अशाही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रेशनच्या धान्याची खरेदी विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. सदर धान्याची खरेदी विक्री केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल, तसेच सदर धान्य खरेदी करणाविरूध्दसुद्धा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदार नीलेश मडके व निरीक्षण अधिकारी नाहुषकुमार बोराडे यांनी दिला आहे, त्यामुळे धान्याचा काळाबाजार करणाराचे धाबे दणाणले असून, खरेदी विक्रीला लगाम बसणार आहे.

Share This Article
Exit mobile version