– अभयारण्य व्यवस्थापनामध्ये लोणारने पटकावले देशात दहावे स्थान!
लोणार (वाजिद खान) – जगविख्यात ‘लोणार सरोवर’मधील परिसर सन २००० साली ‘लोणार सरोवर अभयारण्य ‘ म्हणून घोषित झाले. बेस्साल्टिक रॉकमधून तयार झालेले एकमेव सरोवर म्हणून लोणार सरोवराची ओळख आहे. ‘लोणार सरोवर अभयारण्य’ हे ३६५ हेक्टर जागेतील जिल्ह्यातील सर्वात लहान अभयारण्य असले तरी देशात या अभयारण्यामुळे बुलढाणा जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. अभयारण्य व्यवस्थापनामध्ये लोणारने देशात दहावे स्थान पटकावल्याने उल्कानगरीच्या किर्तीचा ठेवा वाढवणारी सकारात्मक बातमी समोर आली आहे.
भारतीय वन्यजीव संस्थान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यंत्रणेने देशभरातील वन्यजीव अभयारण्याचा नुकताच आढावा घेतला. यामध्ये रामसर हा जागतिक कीर्तीचा दर्जा प्राप्त असलेल्या लोणार अभयारण्याचा देखील समावेश होता. जंगलांच्या प्रभावी व्यवस्थापनामध्ये लोणार अभयारण्याचा देशांमध्ये दहावा क्रमांक लागला आहे. महाराष्ट्रातील उमरेड कराडला राज्यात पहिले तर राज्यात सातवे स्थान मिळाले आहे. देशभरातील ४३८ राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्याचे मूल्यमापन करण्यात आले. विविध जंगलांची व्यवस्थापन कशा प्रकारे केली जाते. याचा अभ्यास गत पाच वर्षांमध्ये करण्यात आला. यामध्ये उत्तम स्थिती ही ८४ ठिकाणी आढळून आली तर वाईट चा शेरा देखील १८ अभयारण्याच्या वाट्याला आल्याची माहिती सूत्राने दिली आहे. लोणार हा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी शासकीय पातळीवर आराखडा घोषित झाला आहे. या आराखड्याचे पुढे काय झाले किंवा त्याची काय स्थिती आहे, त्याची माहिती जिल्हावासीयांना चांगलीच आहे. जगभरातून पर्यटकांना बुलढाणा जिल्ह्यात खेचून आणण्याची क्षमता असलेल्या या लोणार आणि येथील वनसंपदेला अनुषंगाने पर्यटन विस्ताराच्या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. हे कधी होईल, हा खरा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरितच आहे. मात्र असे असले तरी देशभरातील अभयारण्य उत्तम व्यवस्थापनामध्ये लोणारचा दहावा क्रमांक लागणे ही बाब नक्कीच सुखावणारी आहे.