– शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला रोखठोक इशारा; तुपकर पोहोचले थेट नुकसानग्रस्तांच्या बांधावर! – मेहकर तालुक्यात केली नुकसानीची पाहणी; शेतकर्यांना दिला धीर!
मेहकर/लोणार (ऋषी दंदाले) – मेहकर व लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काल, दि.२७ जूनरोजी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आरेगाव, डोणगाव, गोहगाव दांदडे, पांगरखेड या गावांमध्ये जाऊन नुकसान झालेल्या शेतजमिनी, शेतीपिकांची आणि घरांची पाहणी केली. घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत, त्याची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी शासनाकडे केली आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी ‘क्रांतिकारी’च्या पदाधिकार्यांना घेऊन काल मेहकर तालुक्याचा दौरा केला. शेतकर्यांनी आपली आपबिती तुपकरांसमोर मांडली. यावेळी तुपकरांच्या डोळ्यातही अश्रू पाहायला मिळाले. डोणगावमध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले तर आरेगाव, गोहगाव दांदडे, पांगरखेड तेली यासह अनेक गावातील शेती वाहून गेली, पिके वाहून गेलीत, पाईपलाईन स्प्रिंकलर वाहून गेलेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. या परिसरातील शेतकर्यांशी तुपकरांनी चर्चा केली व शेतकर्यांना आधार दिला. हिम्मत न हारता परिस्थितीला सामोरे जाऊ व नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करु असा शब्द दिला. झालेलं नुकसान खूप मोठं आहे. शेतकरी पुन्हा उभा राहण्याच्या स्थितीत नाही. शेती पिकं वाहून गेली आहेत, विहिरी खचल्या आहेत, पाईपलाइन आणि स्प्रिंकलर वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी मातीचा थर जाऊन जमिनी उघड्या पडल्या आहेत. दुबार पेरणीचं संकट आहे. सगळीकडे हाहाकार माजलाय.’ अश्या परिस्थितीत सरकारने मदतीचा हात पुढे करून बळीराजाला वाचवलं पाहिजे, शेतकर्यांचा संयम तुटायची वाट पाहू नका, अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ, असाही इशारा तुपकरांनी यावेळी प्रशासनाला दिला.