कै.भास्कररावजी शिंगणे हायस्कूलचे आणखी दोन विद्यार्थी शासकीय सेवेत!

admin 2 Min Read
2 Min Read

– शिवदास देशमुखची एमपीएससीमार्फत वनरक्षक अधिकारीपदी नियुक्ती, तर सतिश खिल्लारे चंद्रपूर पोलिस दलात भरती
– शासकीय हुद्द्यावर नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेकडून सत्कार करून अभिनंदन

देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील मंडपगाव-चिंचखेड येथील कै.भास्कररावजी शिंगणे हायस्कूलचा विद्यार्थी शिवदास मधुकर देशमुख याची वनरक्षक अधिकारी चंद्रपूर येथे राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून निवड झाली. त्याबद्दल शाळेच्यावतीने मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण मिसाळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी सतीश मोतीराम खिल्लारे याची चंद्रपूर पोलिस दलामध्ये नियुक्ती झाली. या करिता त्यांचेदेखील शाळेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. हे दोन्ही विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असून, अतिशय खडतर मेहनतीतून त्यांनी हे यश संपादन केलेले आहे.

तालुक्यातील मंडपगाव-चिंचखेड येथील कै.भास्कररावजी शिंगणे हायस्कूल या शाळेचा इतिहास बघितला असता २००६ पासून तर आतापर्यंत जवळ जवळ १७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी शासकीय सेवेमध्ये रुजू झालेली आहेत. त्यामध्ये तीन विद्यार्थी हे वैद्यकीय सेवेमध्ये, दोन विद्यार्थी एनडीएच्या माध्यमातून, एक विद्यार्थी नेव्हीमध्ये, एक विद्यार्थी एअर फोर्स, तसेच इतर शासकीय सेवेमध्ये पोलिस, सैनिक, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, कृषीसेवक, कॅनाल इन्स्पेक्टर, मंत्रालयामध्ये वरिष्ठ क्लर्क आदी हुद्यांवर नियुक्त होऊन कार्यरत झालेले आहेत. हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील, शेतकरी, कष्टकरी, मजूर, सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांनी मेहनतीतून हे यश संपादन केलेले आहे. त्यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण मिसाळ सर, विद्यालयातील सर्व शिक्षक, त्यांचे पालक यांचा त्यांच्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील संस्कार देणारे हे विद्यालय म्हणजे एक संस्कार केंद्रच ठरले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव एस के चित्ते सर, शाळेचे मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण मिसाळ सर, शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केलेले आहे.

Share This Article
Exit mobile version