– शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मुंबईतून ठणकावले; तुपकर आक्रमक; पीकविमा आंदोलन पुन्हा पेटणार! – तुपकरांनी गाठले एआयसी कंपनीचे मुंबई कार्यालय; मुंबईत क्षेत्रीय व्यवस्थापकांची घेतली भेट!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा जिल्ह्यातील सन २०२३ व २०२४ चा हजारो शेतकर्यांचा पीकविमा अजूनही प्रलंबित आहे. नुकसान होऊनही अनेक शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित असल्याने शेतकर्यांमध्ये असंतोष आहे. ‘त्या’ अन्यायग्रस्त शेतकर्यांना तातडीने पीकविमा मिळावा, यासाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे (एआयसी) मुंबईतील कार्यालय गाठत, राज्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री बी. प्रभाकर यांची भेट घेतली. राहिलेल्या पीकविमा भरपाईबद्दल सविस्तर चर्चा करून, त्यांना जाब विचारला व आक्रमक भूमिका घेतली. उर्वरित पीकविमा द्या; अन्यथा शेतकर्यांना घेऊन एआयसीच्या मुंबई कार्यालयात घुसू, असा इशारा याप्रसंगी तुपकरांनी पीकविमा कंपनीला दिला.
बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील एआयसी पीकविमा कंपनीकडे येणार्या अनेक जिल्ह्यांतील शेतकर्यांना अजूनपर्यंत नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तुपकरांनी एआयसी या पीकविमा कंपनीच्या मुंबई कार्यालयात जाऊन राज्याच्या क्षेत्रीय व्यवस्थापक बी प्रभाकर यांना चांगलाच जाब विचारला व त्यांना धारेवर धरले. भारतीय कृषी आयुर्विमा कंपनीने शेतकर्यांना फसविले आहे. आपले कर्मचारी जास्त नुकसान टाकतो म्हणून शेतकर्यांकडून पैसे उकळतात, पंचनामा फॉर्मवर आवश्यक असतांनाही कृषी सहाय्यक, सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या नसतात, परस्पर कमी नुकसान टाकून तुमच्या कर्मचार्याकडून फॉर्म भरले जातात, असा आरोप रविकांत तुपकरांनी केला. नुकसान होऊनही हजारो शेतकर्यांना पीकविमा देण्यासाठी विमा कंपनी मुद्दाम टाळाटाळ करीत असल्याचेही तुपकरांचे म्हणने आहे. हा सरळ सरळ शेतकर्यांवर अन्याय आहे. पीकविमा कंपनी व सरकारचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोपही तुपकरांनी केला. ‘त्या’ खर्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी तुपकरांनी जोरदारपणे लावून धरली. भरपाई लवकर मिळाली नाही तर क्रांतीकारी शेतकरी संघटना नुकसानग्रस्त शेतकर्यांना घेऊन एआयसीच्या मुंबई कार्यालयात घुसेल व आक्रमक आंदोलन करेल, असा कडक इशाराही तुपकरांनी यावेळी दिला.