चार दशके उभ्या असलेल्या शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला चिखलीकरांकडून भावनिक निरोप!

admin 3 Min Read
3 Min Read

– चिखलीच्या विकासकन्या आ. श्वेताताई महाले यांनी आणला ५० लाखाचा निधी; लवकरच उभारला जाणार १५ फुटांचा भव्य अश्वारूढ पुतळा!
– विधिवत पूजन व शिवरायांच्या महाआरतीने जुना पुतळा हटविला; आता नवा पुतळा चिखलीच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात घालणार भर!

चिखली (राजेश लोखंडे) – शहरातील ४० वर्षापासून असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला चिखली शहरातील नागरिकांनी आज (दि.२५) भावनिक निरोप देत, एका नव्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली. येथील शिवाजी महाराज चौकात सन १९८५ पासून उभा असलेला पुतळा आता नव्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी हटवण्यात येत असून, लवकरच त्या जागी १५ फूट उंच आणि सुमारे २३०० किलो वजनी अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या नव्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी चिखलीच्या विकासकन्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी राज्य शासनाकडून सर्व प्रशासकीय मान्यता मिळवून ५० लाखांचा निधीही मंजूर करून घेतला आहे. हा निधी केवळ पुतळा उभारणीसाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठीही वापरण्यात येणार आहे. या नव्या स्मारकामुळे चिखलीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीत भर पडणार आहे.

हा भव्य अश्वारूढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार ललित धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार प्रसाद मोडक यांनी तयार केला आहे. पुतळा ब्राँझ धातूपासून तयार करण्यात आला असून, त्यावरील चित्रांकन प्रसिद्ध चित्रकार कविता देशमुख यांनी केले आहे. २५ जूनरोजी सकाळी ११ वाजता पुतळा हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तत्पूर्वी महाराजांच्या जुन्या पुतळ्याचे विधिवत पूजन, दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हभप प्रकाश महाराज जवंजाळ, सुरेशअप्पा खबुतरे, पंडितराव देशमुख, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित, चिखली मंडळ अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, श्री शिवप्रतिष्ठानचे गणेश चव्हाण, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी नागरिक, शिवप्रेमी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भावनिक क्षणी संपूर्ण चौकात शिवगर्जना दुमदुमली. या ऐतिहासिक उपक्रमात तहसीलदार संतोष काकडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पोलिस निरीक्षक संग्राम पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक चिंचोले यांच्यासह शासकीय यंत्रणा सक्रिय होती. हे स्मारक केवळ एक शिल्प नसून, चिखलीकरांच्या शिवभक्तीची आणि स्वाभिमानाची ओळख असणार आहे. लवकरच या जागेवर उभा राहणारा भव्य अश्वारूढ पुतळा चिखली शहराच्या वैभवात भर घालणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये १९८५ मध्ये शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा नगरपालिकेद्वारे स्थापन करण्यात आला होता. शरद पवार, प्रमोद महाजन यांच्यासह तत्कालीन आमदार भारत बोंद्रे यांच्याहस्ते अनावरन झाले होते. आता त्याच जागेवर महाराजांचा भव्य असा नवीन अश्वारूढ पुतळा स्थापन केला जात आहे. या नवीन अश्वारूढ पुतळ्याची उंची 15 फूट असून वजन सुमारे 2200 ते 2300 किलोग्राम एवढे असणार आहे. हा पुतळा पूर्णपणे ब्राँझ धातूचा असणार असून याची निर्मिती करह: स्टुडिओ पुणे येथील प्रसिद्ध शिल्पकार ललित धनवे जे इटलीतील प्रसिद्ध शिल्पकला कंपनी एफएए यांच्या सोबत काम करतात त्यांच्या सहाय्याने शिल्पकार  प्रसाद मोडक यांनी केली आहे व या शिल्पावरील चित्रकला चित्रकार सौ. कविता देशमुख यांनी चित्रित केली आहे.

Share This Article
Exit mobile version