झेडपी शाळेत पाल्यांना प्रवेश देणार्‍या पालकांना घरपट्टी व पाणीपट्टीत ५० टक्के सूट!

admin 2 Min Read
2 Min Read

– जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी पिंप्री खंदारे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव पारीत!

बिबी (ऋषी दंदाले) – खासगी इंग्रजी शाळांकडे वाढलेला कल पाहता, अनेक पालकांनी जिल्हा परिषद शाळेकडे पाठ फिरवली आहे. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. शाळेची पटसंख्या टिकून ठेवण्यासाठी मौजे पिंप्री खंदारे येथील ग्रामपंचायतीने सर्व गावकर्‍यांच्या संमतीने अनोखी शक्कल लढवून जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेशित करणार्‍या पालकांना दिनांक १ जून २०२५ पासून पाणी व घरपट्टीत ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याचा ठराव पारित केला. याबाबत ग्रामपंचायत सदस्य सौ.कमल अशोक पवार यांनी ही सूचना मांडली व सौ.सविता नरसिंह चौधर यांनी अनुमोदन दिले. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. यासंदर्भात ग्रामपंचायत सरपंच कमल चौधर, ग्रामपंचायत अधिकारी संदीप काळे यांनी ठराव संमत केला.

या शाळेने अनेक कोहिनूर घडविले आहेत. याच शाळेत प्राथमिक मूळ पाया पक्का करून अनेक विद्यार्थ्यांनी नामांकित विद्यापीठांमध्ये व इतर राष्ट्रात शैक्षणिक प्रवेश मिळवून आपल्या स्वबळावर स्वतःची एक वेगळी छबी निर्माण केली आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेत पाल्यांना प्रवेश द्या आणि घरपट्टी (स्थानीय कर) ५० टक्के माफीचा लाभ घ्या, अशी योजनाच सुरू केली आहे. या निर्णयाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. पिंप्री खंदारे येथील ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा आणि शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान संचयचं नव्हे तर संस्कारासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच व्हावा, यासाठी पिंप्री खंदारे येथील ग्रामपंचायत व गणेश उबाळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शाळेत जातीने लक्ष घालणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share This Article
Exit mobile version