– जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख हत्याकांड प्रकरण
– सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
बुलढाणा (राजेश लोखंडे) – ‘माझ्या पतीने काही शेती घेतली होती व त्या शेतीवर काही राजकीय व्यक्तींचा डोळा होता. त्यामुळे माझ्या पतीच्या हत्येत काही राजकीय व्यक्तीसुद्धा गुंतले असावेत, असा गंभीर आरोप भाजप कार्यकर्ते व भाजपचे आमदार डॉ.संजय कुटे यांचे कारचालक पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण गुंतागुंतीचे बनले असून, सुनीता देशमुख यांनी ज्या राजकीय व्यक्तींवर संशयाचे बोट दाखवले आहे, तो नेमके कोण? याबाबत जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेऊन, या हत्याकांडाच्या सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. या शिष्टंमडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर, शिवसेनेच्या प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसेनजीत पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

