– तातडीने हालचाल करून शेतात पडलेले वीज खांब उचलल्याने मिसाळवाडीतील शेतकर्यांच्या पेरण्यांचा मार्ग मोकळा!
– मागील आठवड्यातील वादळी वार्यामुळे फळबागांसह महावितरणचे मोठे नुकसान
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र टीम’ने गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर उपविभागीय अभियंता एस.जी. शेटे यांची तातडीची कार्यवाही!
देऊळगावराजा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – मागील आठवड्यात चिखली व देऊळगावराजा तालुक्यांत वादळी वार्यासह पाऊस झाल्याने महावितरणचे विजेचे खांब कोसळून पडले होते, तसेच तारांवर झाडे पडल्याने तारादेखील तुटल्या होत्या. त्यामुळे महावितरणची मोठी हानी होऊन वीज पुरवठाही खंडित झाला होता. तसेच, विजेचे खांब शेतात पडल्याने मिसाळवाडी येथील १० ते १५ शेतकर्यांसह मिसाळवाडी शेतशिवारातील अनेक शेतकर्यांच्या पेरण्या रखडून पडल्या होत्या. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वरिष्ठस्तरीय टीमने शेतकर्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य तातडीने महावितरणचे परिमंडळ कार्यकारी अभियंता यांच्यासह देऊळगावराजाचे उपविभागीय उपकार्यकारी अभियंता एस. जी. शेटे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मनुष्यबळ कमी असतानाही तातडीने मिसाळवाडी शिवारात मनुष्यबळ पाठवून हे पडलेले खांब उचलले व शेतकर्यांच्या पेरण्यांचा प्रश्न मार्गी लावला. दरम्यान, या वादळी पावसामुळे फळबागांसह महावितरणच्या मालमत्तेची मोठी हानी झाली असून, अतिशय विपरीत परिस्थितीतही श्री शेटे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वीज पुरवठा सुरूळीत करून पाणी पुरवठा व नागरी वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावल्याने नागरिक व शेतकरी त्यांना धन्यवाद देत आहेत.
विशेष म्हणजे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीदेखील याप्रश्नी बुलढाणा कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून, मिसाळवाडी येथील शेतात पडलेले पोल तातडीने उचलून वीज पुरवठा सुरूळीत करावा, अशी सूचना केली होती. याबाबत ते ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादकीय संचालक शिवश्री प्रवीण मिसाळ पाटील यांच्या संपर्कातही होते. माजी मंत्री तथा माजी आमदार डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनीही तातडीने महावितरणला फोन करून शेतकरीवर्गाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.

