नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अहिल्यानगरच्या सीमेवर मुंगी येथे प्रशासनाकडून जोरदार स्वागत!

admin 3 Min Read
3 Min Read

– हाती टाळ घेऊन अधिकारीही भक्तीभावात रंगले; नाथ महाराजांच्या पादुकादर्शनासाठी भाविकांची गर्दी!
– हातगावी मुक्कामकरून पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ; जागोजागी जोरदार स्वागत!

नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – राज्याच्या संत परंपरेत मानाचे स्थान असलेल्या पैठण येथील शांतीब्रम्ह श्रीसंत एकनाथ महाराज यांचा पादुका पायी पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. या पालखी सोहळ्याचे ‘भानुदास एकनाथ’चा जयघोष करीत तालुक्यातील मुंगी येथे अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करताना अधिकारीदेखील हातात टाळ घेऊन विठूरायांच्या व नाथ महाराजांच्या नामघोषात रंगल्याचे यावेळी दिसून आले. नाथ महाराजांच्या पादुकादर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

पैठणनगरीच्या पालखी प्रस्थान ओट्यावरून पंढरपूरकडे हजारो वारकरी भाविक भक्ताच्या उपस्थितीत काल, दि.१८ जूनरोजी सूर्यास्तच्या वेळात सालाबाद प्रमाणे प्रस्थान झाले. नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला हा पालखी सोहळा आज (दि.१९ जून) अहिल्यानगर जिल्ह्यात आगमनकर्ता झाला. मुंगी येथे पालखी दाखल होताच जिल्हा प्रशानाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. पालखीचे व नाथांच्या पादुकांचे दर्शन घेऊन विधिवत पूजन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी राहुल शेळके, प्रांताधिकारी प्रसाद मते, गटविकास अधिकारी सोनल शहा, सहाय्यक गटविकास अधिकारी अजित बांगर, नायब तहसीलदार दीपक कारखिले, कक्ष अधिकारी सचिन भाकरे, विस्तार अधिकारी रामकिसन जाधव, दिगंबर भांड, गौतम फसगे, दादासाहेब शेळके, महादेव भोसले, सरपंच सुभाष पवार, राजेंद्र ढमढेरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश देशमुख, अमोल गव्हाणे, गुलाब गव्हाणे, सरपंच ललिता ढमढेरे, मिलिंद गायकवाड, कारभारी खरात, सतिश गव्हाणे, प्रदीप राजेभोसले, ग्रामसेवक राठोडसह हजारो भाविकांच्या उपस्थित भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. नाथांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पादुकांचे विधीवत पूजन करुन व चांदीच्या रथात पादुका ठेवून ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत, हातगावकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. याप्रसंगी नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांचे प्रशासन व ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यंदा चांगला पाऊस पडल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. असंख्य दिंड्यासह हजारो वारकरी हातात भगवा पताका घेत टाळ मृदंगाच्या गजरात ‘भानुदास एकनाथ’च्या जयघोषात, अभंग व भजनात तल्लीन होऊन पायी दिंडीत सहभागी झाले होते.


  • नाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत केल्यानंतर प्रांताधिकारी प्रसाद मते, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित बांगर, सचिन भाकरे यांनी टाळ हातात घेवून पालखीत सहभाग घेऊन भजनात दंग झाले होते.
  • वारकरी व भाविकांना पिण्याची पाणी, आरोग्य सुविधा, नाष्टा भोजन आदी सुविधा सोबत न्हावी, चप्पल दुरुस्ती, आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. मुंगीसह प्रवासातील गावोगावी त्याचे स्टॉल लावण्यात आले होते.
  • आज हातगाव मुक्कामाहून पैठण- पंढरपूर या पालखी मार्गाने बोधेगाव, बालमटाकळी, बाडगव्हाण, लाडजळगाव पालखी दाखल होणार आहे.

सर्व छायाचित्रे बाळासाहेब खेडकर.

Share This Article
Exit mobile version