कुंडमळा पूल कोसळला; अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती;३८ जणांना वाचवल्याची माहिती!

admin 2 Min Read
2 Min Read

– दोन ठार, सहा जणांची प्रकृती चिंताजनक; वाहून गेलेल्यांचा शोध सुरू!

पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील इंदोरीजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी (दि.१५) दुपारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पुलावरून अनेक पर्यटक नदीत वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मदत व शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ३८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यापैकी ३२ जण जखमी असून, त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘पुणे जिल्ह्यातील इंदोरीजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’ या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व तहसीलदारांशी सातत्याने संपर्कात राहून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून,बचाव कार्य सुरू आहे.सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे म्हटले असले तरी या माहितीला स्थानिक प्रशासनाकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, मावळचे आमदार सुनील शेळके हेदेखील घटनास्थळी पोहोचले असून, मदत व समन्वयासाठी ते स्वतः कार्यरत आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील घटनास्थळी भेट देत स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. हा पूल सुमारे ३० वर्षांपूर्वी माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आला होता. पावसाळ्यात पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कुंडमळा परिसरात रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी झाली होती. या पादचारी पुलावरून पादचार्‍यांबरोबरच दुचाकी वाहनेही जात असत. अचानक पुलाचा काही भाग कोसळल्याने त्यावरील अनेक जण पाण्यात वाहून गेले.


तळेगाव एमआयडीसी पोलिस, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व विविध बचाव पथकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे. घटनास्थळाजवळ नागरिकांची गर्दी असून, भीतीचे वातावरण आहे.प्रशासनाकडून पुलाच्या स्थितीबाबत चौकशी सुरू आहे.

Share This Article
Exit mobile version