सावखेड तेजन येथे अल्पभूधारक युवा शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

admin 2 Min Read
2 Min Read

– आर्थिक अडचणीतून उचलले टोकाचे पाऊल; सततची नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे होते हतबल!

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील सावखेड तेजन येथील गजानन कारभारी जायभाये या अल्पभूधारक युवा शेतकर्‍याने आर्थिक अडचणीतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.१५) सकाळी उघडकीस आली. खरीप पेरणीच्या ऐन तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

सुमारे साडेचार ते पाच एकर शेती असलेले वडील कारभारी जायभाये यांच्या मृत्यूनंतर आई व सर्व तीन भाऊ हे कुटुंब आहे. यामध्ये मधला भाऊ असलेल्या ४० वर्षीय वयाच्या गजानन जायभाये याच्या वाट्यावर केवळ दीड एकर शेती आहे. यातून मिळणार्‍या उत्पन्नावर त्याच्यासह कुटुंबात आई, पत्नी, इयत्ता ११ वीमध्ये शिकणारी एक मुलगी व इयत्ता ८ वीमध्ये शिकणारा मुलगा अशा पाच सदस्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. पोटाला चिमटा घेऊन, अनेक बाबतीत काटकसर करीत संसाराची वाटचाल सुरु होती. एकूण सर्वच परिस्थितीमुळे गजानन नेहमीच आर्थिक अडचणीत राहायचा. यासंदर्भात तो नेहमीच आपल्या स्नेही व मित्र मंडळींजवळ हतबलता व्यक्त करायचा. मुलगी लग्नाला आलेली त्यात, कुटुंब एकत्रित असतांनाचे वडिलांवरचे कर्ज फेडणे बाकी असल्याचेही गजानन अधूनमधून बोलायचा. तर आता खरीप हंगाम तोंडावर असतांना, पेरणीच्या तयारीसाठी आर्थिक तरतूद नसल्याने तो गंभीरपणे अधिकच काळजी व्यक्त करीत होता. यासर्व कठीण परिस्थितीमुळे गजानन अस्वस्थ होत होता. त्याच काळजीत तो काल दि. १४ जून, शनिवारी सायंकाळनंतर घरातून निघून गेला होता व रात्रभर परतलाच नव्हता. आज सकाळी गावाच्या पूर्व दिशेला उमरद मार्गाकडे असलेल्या शेतातील लोखंडीच्या झाडाला गळफास घेत लटकलेल्या अवस्थेत गजानन जायभाये याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच, सिंदखेडराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करीत शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. त्यानंतर दुपारी सावखेड तेजन येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीतून युवा शेतकर्‍याने केलेल्या आत्महत्येमुळे गाव, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Exit mobile version