– १५ दिवसांसाठी आलेले पाहुणे दोन दिवसांत निघून गेले!
– साखरखेर्डा टाऊन वेगळं करण्याची गरज, प्रत्येक डीटीपीवर एबी स्विचची गरज!
– साखरखेर्डा ते शेंदुर्जन ३३ केव्हीचे काम पूर्ण कधी होणार?
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – पाऊस आला की वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण साखरखेर्डा भागात जास्त वाढले आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाला की तो कधी सुरु होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. अनेक समस्यांनी साखरखेर्डा येथील सबस्टेशन ग्रासले आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा, येरे माझ्या मागल्याप्रमाणे रात्रभर चाचपडत नागरिकांना राहावे लागेल. १५ दिवसांसाठी आलेले पाहुणे वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यांना दोन दिवसांत साखरखेर्डा सोडण्याची वेळ आली.
१५ दिवसांसाठी आले आणि दोन दिवसांत निघून गेले!
साखरखेर्डा येथील साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक मधुकर (काका) देशपांडे यांची साखरखेर्डा भागात एक हजारपेक्षा जास्त एकर शेती होती. मुले नागपूर, पुणे येथे स्थायिक झाल्याने भरपूर शेती विकली. काही कूळ कायदा लागल्याने सोडावी लागली. तरीही जी काही शेती आहे. त्यासाठी वर्षातून दोनवेळा ते आपल्या आलिशान बंगल्यात राहायला येतात. गावरान आंबा उतरणीचे काम सुरु आहे. त्याचा हिस्सा त्यांना मिळतो. त्यामुळे ते कुटुंबासह १५ दिवस वास्तव्य करून राहतात. परंतु, साखरखेर्डा येथील खंडित वीज पुरवठ्यामुळे दोन दिवसांत साखरखेर्डा सोडण्याची वेळ आली. साखरखेर्डा येथील नागरिकांनी आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा, हे वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी जाहीर करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया बुलढाणा अर्बनचे संचालक किशोर महाजन यांनी व्यक्त केली.
आज साखरखेर्डा भागात चार वीज वितरण कंपनीचे ठेकेदार काम करतात. एकाही ठिकाणी काम व्यवस्थित नाही. कोठे पोल वाकले, तर कोठे पडलेले आहेत. ते सरळ करीत नाही. तुटलेल्या वीज वाहक तार जोडणी करीत नाही. त्यामुळे हा संपूर्ण त्रास होत आहे. अशी प्रतिक्रिया साखरखेर्डा येथील सबस्टेशन वरील कर्मचार्यांनी दिली.

