– कर्जमाफीची तारीख देण्यासाठी सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन! – उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले सरकारच्या लेखी आश्वासनाचे पत्र
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या आठवडाभरापासून अन्नत्याग आंदोलन करणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी आपले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेत, सरकारची बाजू मांडली. यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफीची तारीख सांगावी. अन्यथा, गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू, मंत्रालयात घुसू, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला. मंत्री उदय सामंत आणि एका विधवा महिलेच्या हातून पाणी पित बच्चू कडू यांनी आंदोलन सोडले.
उपोषण आंदोलन मागे घेतल्यानंतर, बच्चू कडू उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत नाही, तर स्थगित करत आहोत. सरकारने आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर २ ऑक्टोबररोजी आपण थेट मंत्रालयात शिरू. आपण सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा चकवा देऊ. सांगू नागपूरला व जाऊ मुंबईला. यांना आपण एकदा छत्रपतींचा गनिमी कावा दाखवू. मुख्यमंत्री सध्या आम्हाला तारीख सांगण्यास तयार नाहीत. पण आम्ही त्यांना २ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. अन्यथा, आम्ही त्यांना माफ करणार नाही. आत्ता आपण हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करत आहोत. मी कार्यकर्त्यांचा अंत पाहू शकत नाही. ते माझ्याशिवाय उठण्यास तयार नाहीत. एक आज्जी तर ऐकण्यास तयारच नव्हती. सर्वच जातीधर्माच्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे मी आभार मानतो. हे यश आमचे नव्हे तर येथे येणार्या सर्वांचे यश आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही उदय सामंत यांच्या घराबाहेर आंदोलन करू, असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काहीच बोलत नव्हते. त्यांनी तर हातच झटकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीवर बोलत नव्हते. पण या सगळ्यांना आपण कर्जमाफीवर बोलायला भाग पाडलं. हा आपल्या आंदोलनाचा विजय असल्याचं म्हणत कडू यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पेरणीचे दिवस आहेत. डोक्यावर पाऊस आहे. त्यासोबत कार्यकर्त्यांच्या भावनादेखील महत्त्वाच्या आहेत. तुम्ही अन्नत्याग आंदोलन सोडा. अन्यथा आम्ही आत्महत्या करु, अशा आशयाचे २०० ते ३०० मेसेज मला आलेले आहेत. काल प्रहारचा एक कार्यकर्ता जीव देण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढला होता. कार्यकर्त्यांच्या भावना आणि डोक्यावर असलेला पाऊस पाहता अन्नत्याग आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केला.