पावसाच्या चार थेंबांचीही तिला अ‍ॅलर्जी; अन् चक्क आठ तास वीज गायब!

admin 4 Min Read
4 Min Read

– त्रस्त गावकर्‍यांची रात्रीच चान्नीच्या महावितरण कार्यालयावर धडक!
– पोलिसांना पाचारण; उपकार्यकारी अभियंता रंगारींच्या मध्यस्थीने तणाव निवळला; सुरळीत वीज पुरवठ्याची दिली हमी!
– अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ३० गावे होते आठ तास अंधारात; रात्री तब्बल एक वाजता वीजपुरवठा सुरूळीत!

बुलढाणा/अकोला (बाळू वानखेडे) – थोडा पाऊस आला की, वीज गायब होण्याच्या तक्रारी सध्या वाढल्या आहेत. काल दि.१३ जूनरोजी झालेल्या पावसामुळे पातुर तालुक्यातील चान्नी ते पातूर या ३३ केव्ही लाईनवर इन्सुलर फुटल्याने व इतर नुकसान होऊन रात्री एक वाजेपर्यंत म्हणजे तब्बल आठ तास वीज गायब होती. यामुळे अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील जवळजवळ ३० गावे अंधारात होती. याबाबत संयमाचा बांध फुटल्याने अखेर चान्नीसह मळसूर, सुकळी, सायवणीसह परिसरातील गावकर्‍यांनी रात्रीच चान्नी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून चान्नी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. पातूरचे उप कार्यकारी अभियंता रंगारी यांनी घटनास्थळी धाव घेत, यशस्वी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. त्यांनी सुरळीत वीज पुरवठ्याबाबत ग्वाही दिली. त्यानंतर रात्री एक वाजता वीज पुरवठा सुरूळीत झाला.

विजेच्या समस्या वाढत असून, पावसाळ्यात यामध्ये आणखी भर पडत असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा सब स्टेशनला अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चान्नी सब स्टेशनमधून वीजपुरवठा केल्या जातो तर चान्नी सबस्टेशनला पातूरवरुन वीज पुरवठा केला जातो. काल, दि.१३ जूनरोजी दुपारदरम्यान पातूर परिसरात पाऊस झाल्याने चान्नी ते पातूरदरम्यान मुख्य लाईनवर फॉल्ट झाल्याने दुपारी ३ वाजेपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे चान्नी सब स्टेशन अंतर्गत उमरा, पांगरा, चरणगाव, सुकळी, राहेर, आडगाव, पिंपळखुटा, सावरगाव, झरंडी, वसाली, चान्नी, मळसूरसह अठरा गावातील तसेच देऊळगाव साखरशा सब स्टेशन अंतर्गत नायगाव देशमुख, पारखेड पाथर्डी, देऊळगाव साखरशा, मांडवा फॉरेस्ट, मांडवा समेत डोंगर, मोहना, वडाळी, पाथर्डीसह २७ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातच रात्रीची वेळ असल्याने त्रस्त झालेल्या गावकर्‍यांचा संयमाचा बांध फुटल्याने, अखेर रात्री ११ वाजेदरम्यान चान्नी सब स्टेशनवर परिसरातील गावकर्‍यांनी धडक दिली व नेहमीच्याच विजेच्या समस्येबाबत जाब विचारला. त्यामुळे येथे काहीकाळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

पातूर ते चान्नी तसेच चान्नी ते देऊळगाव साखरशा हे अंतर ४० किलोमीटरचे असून, बहुतांश लाईन वन विभागातून गेली आहे. त्यामुळे येथे पर्यायी लाईन टाकण्यास कोणताही वाव नाही. आहे त्याच लाईनमध्ये आवश्यक सुधारणा करत, सुरळीत वीजपुरवठा देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील, असे उपकार्यकारी अभियंता रंगारी यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये म्हणून चान्नी पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांचा ताफा घटनास्थळी पाचारण करण्यात आला होता. पातूरचे उपकार्यकारी अभियंता रंगारी यांनी त्याचवेळी घटनास्थळी येऊन गावकर्‍यांशी संवाद साधत समजूत काढली, त्यामुळे वातावरणदेखील शांत झाले. एकंदरीत विजेच्या नेहमीच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त असून, सुरळीत वीजपुरवठ्याची रास्त मागणी करीत आहेत. वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करू, असा इशारा देऊळगाव साखरशाचे सरपंच संदीप अल्हाट सह इतरांनी दिला आहे.


काही कर्मचार्‍यामुळे रोषाला खतपाणी!

आधीच वीज गायब आठ ते नऊ तास गायब, त्यातच कर्मचार्‍यांची बोलण्याची उध्दट पद्धत, त्यामुळे वीज वितरणला जनतेच्या रोषाला आणखी बळी पडावे लागत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे असे झाले की, १३ जून चे रात्री १० वाजे दरम्यान वीजपुरवठा खंडितबाबत चान्नी सबस्टेशनच्या ७८७५३३४५४१ या क्रमांकावर विचारणा केली असता, शेगावीच्या राणाचे साधर्म्य ‘नाव’ असलेल्या या कर्मचार्‍याने लाईन यायला तीन तास लागतील, तुमची लाईन तुमच्या जिल्ह्यातून जोडून घ्या, आमचा त्रास कमी करा, असे उद्धटपणे सुनावले. याबाबत अधिक चौकशी केली असता, या कर्मचार्‍याबाबत बर्‍याच तक्रारी असून, त्याच्या ऊ़ध्दटपणाला लगाम घालत समज देणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

Share This Article
Exit mobile version