– मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेला बळ!
– सेवानिवृत्त कर्मचार्यांचा टंचाईचा प्रश्न संपला; शासनाने मान्यताप्राप्त पदवीधर पशुवैद्यकांना मानधनावर नियुक्त करण्यास दिली परवानगी!
मुंबई/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – महाराष्ट्र शासनाने पशुपालकांच्या दारात थेट आरोग्यसेवा पोहोचवणार्या ‘मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने’ला अधिक गतिशील करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, राज्यात कार्यरत फिरते पशुचिकित्सा पथकांवर आता सेवानिवृत्त अधिकार्यांऐवजी कंत्राटी तत्वावर ‘नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्यकांची’ नियुक्ती करता येणार आहे. २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार, पशुपालकांना त्यांच्या गावातच पशुआरोग्य सुविधा देण्यासाठी फिरते पथक कार्यरत करण्यात आले होते. मात्र पुरेशा प्रमाणात सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्याने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात अडचणी येत होत्या.
- पशुपालकांच्या हितासाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अधिक परिणामकारक होण्यासाठी हा शासन निर्णय टप्पा ठरणार आहे. आता गावपातळीवर अधिक सुलभपणे पशुआरोग्यसेवा मिळणार असून, खासगी पशुवैद्यकांनाही शासन सेवेत योगदान देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
- राज्यात फिरते पशु चिकित्सा पथक योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत, पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी फिरते पशुवैद्यकीय पथके (Mobile Veterinary Units) तयार करण्यात आली आहेत. 1962 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून पशुपालक या सेवांचा लाभ घेऊ शकतात. राज्यातील पशुधनाला कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व आणि गर्भधारणा तपासणी इत्यादी सुविधा पशुवैद्यकीय संस्थेद्वारे पुरवल्या जातात.

