वाढवच्या माजी सरपंचांचा शेतजमिनीच्या वादातून खून, तिघांविरोधात खुनाचे गुन्हे दाखल!

admin 2 Min Read
2 Min Read

– लोणार पोलिसांत पत्नीची तक्रार; दोघांना अटक, एक फरार

लोणार (वाजिद खान) – तालुक्यातील वाढव येथून बेपत्ता झालेले ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच अशोक आबाजी सोनुने (वय ६०) यांचा मृतदेह मंगळवार, दि.१० जूनरोजी आढळला होता. त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना अटक झाली असून, एक जण अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत असून, हा खून शेतजमिनीच्या वादातून झाल्याचे पत्नीने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

माजी सरपंच अशोक सोनुने हे दि. ११ मे रोजी पोलिस ठाण्यात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. परंतु ते घरी परतले नाहीत, तेव्हा अशोक सोनुने यांच्या पत्नी लता सोनुने यांनी दि. १४ मे रोजी लोणार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, मंगळवारी, १० जून रोजी शहरातील हिरडव रोडवरील मापारी गुरुकुल शाळेच्या मागे असलेल्या टिन शेडमध्ये अशोक सोनुने यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. सोनुने यांच्या पत्नी लता सोनुने यांनी याप्रकरणी लोणार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, आरोपी कैलाश प्रकाश सोनुने, प्रशांत प्रकाश सोनुने आणि संतोष एकनाथ सोनुने (सर्व रहिवासी वाढव) यांनी जमिनीच्या वादातून तिच्या पतीला बेदम मारहाण करून ठार मारले. या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी सुरू आहे. आरोपी संतोष एकनाथ सोनुने अद्याप फरार आहे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक निमिश मेहतारे यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने, लोणार ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवपरीक्षणानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले होते. लोणार पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळेच हा दुर्देवी खून पडला असल्याची संतप्त भावना परिसरात आहे.

Share This Article
Exit mobile version