– ऐन दिवाळीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे फटाके फुटणार!
– बुलढाणा जिल्ह्यात आता ६१ जिल्हा परिषद सदस्य
– २०२२ च्या प्रभाग रचनेनुसार जिल्ह्यात झाले होते ६८ जिल्हा परिषद गट!
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींबरोबरच आता राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूककरिता प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून काल, दि. १२ जूनरोजी संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. सन २०२२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण रचनेत बुलढाणा जिल्ह्यात ६८ गट व १३६ गण निश्चित करण्यात आले होते. परंतु आता शासनाकडून बुलढाणा जिल्ह्यात ६१ जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २०२२ अगोदर ६० गट होते, आता मेहकर तालुक्यात ७ गट निश्चित करण्यात आले आहेत. या निमित्ताने आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून, ऐन दिवाळीतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत. त्या दृष्टीने सर्वच प्रमुख पक्षांच्या कामाला गती येणार आहे. विशेष म्हणजे, २०२२ अगोदर जिल्ह्यात ६० जिल्हा परिषद गट होते. आता ६१ सदस्य संख्या निश्चित झाली असल्याने मेहकर तालुक्यात आता एक जिल्हा परिषद गट वाढणार आहे. इतर तालुक्यातील गटांत मात्र बदल होणार नसल्याचे दिसून येत आहे.
राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. सदर संस्थावर प्रशासकराज असल्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत, अशी ओरड सर्वत्र सुरू होती. आता सदर निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने प्रशासन कामाला लागले आहे. काल, दि. १२ जूनरोजी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत प्रभाग रचनेबाबत संबंधित विभागाकडून आदेश धडकला असतानाच, त्याच्या काही तासानंतरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रभाग रचनेबाबत आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. राज्यात आघाडीचे सरकार असताना सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्यात आली होती. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता येथे २०२२ पूर्वी जिल्हा परिषदेचे ६० गट होते. तर महाविकास आघाडी सरकारने ६० ऐवजी ६८ गट तर पंचायत समितीचे १३६ गण निश्चित केले होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी ही सर्व प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्याने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे निवडणूक आयोग व शासनाकडून या प्रक्रियेला आता वेग आला असून, प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता मेहकर तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट वाढले होते. आता बुलढाणा जिल्ह्यात ६१ जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित केल्याने आता ६१ गट व पंचायत समितीचे १२२ गण निश्चित होणार आहेत. मेहकर तालुक्यात २०२२ चे पूर्वी ६ जिल्हा परिषद गट होते. २०२२ चे पुनर्रचनेत ८ जिल्हा परिषद गट झाले तर आता तालुक्यात ७ जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्यात आल्याने ७ जिल्हा परिषद गट होणार आहेत. आता मेहकर मध्ये सात गट निश्चित करण्यात येणार आहेत. गट व गणांची संख्या बदलल्यामुळे आता आरक्षण पुन्हा काढावे लागणार आहे, त्यामुळे आरक्षणासह सर्वबाबतीत आता बदल होणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक दिवाळीतच येणार असल्याने, आता दिवाळी सोबतच या निवडणुकीचे फटाके जोरात फुटणार असून, त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या कामाला आता वेग येणार आहे.
जिल्हा_परिषद_व_पंचायत_समिती_प्रभाग_रचना_2025 बाबत शासन आदेश वाचण्यासाठी येथे क्लीक करा..

