‘मिशन झेड’: ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवणार्‍या उपक्रमावर आधारित लघुपटाच्या निर्मात्यास आयपीएस बीरदेव ढोणे यांचे गौरवाचे निमंत्रण!

admin 2 Min Read
2 Min Read

– बुलढाण्यात सुरू झालेली संकल्पना आता राज्यभर झळकणार!
– उस्मानाबादमध्ये रविवारी होणार सन्मान सोहळा!

बुलढाणा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – गोरगरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवणार्‍या ‘मिशन झेड’ या नाविन्यपूर्ण शैक्षणिक संकल्पनेवर आधारित लघुपट तयार करणारे गजानन कंकाळ यांना आय.पी.एस. अधिकारी बीरदेव ढोणे यांच्याहस्ते रविवार, १५ जून २०२५ रोजी उस्मानाबाद येथे होणार्‍या विशेष समारंभात गौरवण्यात येणार आहे. ही संकल्पना बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली असून, ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल, पण शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांसारख्या उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे ध्येय घेऊन ‘मिशन झेड’ राबवले जात आहे.

शिक्षण विभागाचे प्रभारी विस्तार अधिकारी गजानन कंकाळ

या संकल्पनेवर आधारित लघुपटाची कल्पना व निर्मिती बुलढाणा पंचायत समितीमध्ये कार्यरत शिक्षण विभागाचे प्रभारी विस्तार अधिकारी गजानन कंकाळ यांनी केली. त्यांनी तयार केलेल्या या लघुपटाने केवळ जिल्ह्यापुरतीच नव्हे, तर राज्यस्तरावरील अधिकार्‍यांचीही दाद मिळवली आहे. पुण्याच्या यशदा संस्थेमध्ये या लघुपटाचे प्रातिनिधिक सादरीकरण झाले होते. या लघुपटामध्ये दाखवलेली कथा कोल्हापूर जिल्ह्यातील येमगे गावातील बीरदेव ढोणे यांच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारी आहे. धनगर समाजातील गरिबी, संघर्ष, आणि शिक्षणाची जिद्द दाखवणार्‍या या कथेला प्रत्यक्ष बीरदेव ढोणे यांनी पाहून स्वत: निर्माता गजानन कंकाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्या कल्पकतेचे व सामाजिक भानाचे कौतुक केले, तसेच लघुपटाच्या माध्यमातून दाखवलेल्या गुलाब खरात यांच्या शैक्षणिक संकल्पनेला सलाम केला.
बीरदेव ढोणे यांच्या म्हणण्यानुसार, ‘मिशन झेड’ वर आधारित माहितीपट लवकरच संपूर्ण राज्यात दाखवण्यात येणार असून, ही संकल्पना इतर जिल्ह्यांनीही आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘मिशन झेड’ ही फक्त शासकीय योजना नसून, ती एक समाज बदलाची चळवळ ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिशा देणारी, संधी उपलब्ध करून देणारी आणि आयुष्य बदलवणारी ही एक विधायक प्रेरणा आहे. यावर आधारित लघुपट, त्याची दखल घेतलेले उच्च पदस्थ अधिकारी आणि राज्यस्तरावर होणारा प्रसार – हे सगळे मिळून एक नवीन शिक्षण क्रांतीची नांदी ठरत आहे.

Share This Article
Exit mobile version