– शेतकर्यांच्या कर्जमाफीकरिता आर्वीत शेतकरीपुत्रांचे आंदोलन – मोझरी येथील आ. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा
वर्धा (प्रकाश कथले) – सरकारने कर्जमाफी देतो म्हणून आमची मते घेतली, त्या मतांवर सत्ता मिळाल्यानंतर कर्जमाफी न देऊन शेतकर्यांना फसविले. बँका कर्ज देत नाही, आता कर्जफेड करा म्हणतात, आमच्याजवळ कर्जाची परतफेड करायला पैसे नाहीत, अंगावरचे कपडे उरले आहेत तेही घ्या, पण शेतकर्यांसोबतची फसवणूक थांबवा, असे म्हणत शेतकरीपुत्रांनी अंगावरचे कपडे काढून आर्वीच्या तहसीलदार टेबलवर ठेवले. यामुळे तहसील कार्यालयात एकच धावपळ निर्माण झाली होती. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित १७ मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला शेतकरीपुत्रांनी समर्थन दिले. आर्वी येथे शेतकर्यांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात हे अभिनव आंदोलन केले होते.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारामुळे आता फक्त आम्हा शेतकर्यांच्या अंगावर कपडे शिल्लक राहिले आहे. आता ते पण तुम्ही घेऊन घ्या, अशा शब्दात बाळा जगताप तसेच शेतकर्यांनी आपल्या भावना आर्वीच्या तहसीलदारासमोर मांडल्या. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मानधन, हमीभावावर २० टक्के अनुदान. ७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे, तरुणांच्या हाताला काम व योग्य दाम देण्यात यावे, रोजगार भरती करण्यात यावी, शेतकर्याप्रमाणे शेतमजुरांनासुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावे, शेतमजुरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी शेतकर्यांनी केल्या. यावेळी जगताप यांच्यासह सुधीर जाचक, विक्रम भगत, संजय कुरिल, कुणाल चव्हाण, राजेश आगरकर, गुड्डू पठाण, अबरार खान, शेख जफर, अब्दुल राहिल, शेख कलीम, अंकुश गोटेफोडे, प्रवीण वाघ, प्रफुल कुंबोत, मंगेश कोल्हे, धीरज गिरडकर, राजू देऊळकर, किरण लोखंडे, शेख इकबाल यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.