– लोणार तालुक्यात खळबळ; २५ दिवसांपासून होते बेपत्ता!
– लोणार पोलिसांच्या तपासावर प्रश्न; मिसिंग देऊनही तपासात केली हलगर्जी!
लोणार (वाजिद खान) – तालुक्यातील वाढव गावाचे माजी सरपंच अशोक आबाजी सोनुने (वय ६०) यांचा लोणार शहरातील हिरडाव रोडवर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपींनी त्यांचा निर्घृण खून करून मृतदेह फेकून देण्यात आला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. अशोक सोनुने हे वाढव गावाचे माजी सरपंच होते आणि १४ मेपासून बेपत्ता होते. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु, लोणार पोलिसांनी तपासात हलगर्जी केल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक करत आहेत. एकूणच या प्रकरणाच्या तपासात पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा दिसून येत आहे. हा प्रकार म्हणजे, मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती आहे का? असाही प्रश्न निर्माण होत हाेता.
लोणार पोलिस ठाण्यात अशोक सोनुने यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, काल संध्याकाळी शहरातील हिरडाव रोडवर एक कुजलेला आणि दुर्गंधीयुक्त मृतदेह आढळला. हा मृतदेह अशोक सोनुने यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिस घटनास्थळी पोहोचले. सूत्रांनी सांगितले की, मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा विविध दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे. काही लोकांना हा खून असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.
गेल्या २५ दिवसांपासून अहवाल देऊनही पोलिस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. अखेर काल उशिरा त्याचा कुजलेला मृतदेह सापडला. पोलिस प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांनी वेळीच तपास केला असता तर कदाचित दुर्देवी घटना टाळता आला असती, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. विशेष म्हणजे, लोणार पोलिसांनी या घटनेबाबत पत्रकारांनादेखील माहिती देण्यास टाळाटाळ चालवली होती. त्यामुळे, पोलिसांवर संशय वाढला आहे.

