– वट सावित्री पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक ‘बारव’ परिसरात स्वच्छता मोहीम राबवून दिला सामाजिक संदेश!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील शिवशक्ती नगरमधील महिलांनी आज, दिनांक १० जून रोजी वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सामाजिक जाणीवेचा परिचय देत, एक अनोखा उपक्रम राबवला. राजमाता जिजाऊंचे वडील व छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा असलेल्या राजे लखोजीराव जाधव यांच्या काळातील ऐतिहासिक बारव या ठिकाणी महिलांनी स्वयंप्रेरणेने स्वच्छता मोहीम राबवत, पर्यावरण रक्षण आणि इतिहास संवर्धनाचा संदेश दिला.
या मोहिमेदरम्यान अनियंत्रित वाढलेली झाडझुडपे कापण्यात आली, परिसरातील साचलेला कचरा जाळून जागा स्वच्छ करण्यात आली. या स्त्रियांनी यापूर्वीदेखील विविध उपक्रम राबवले असून, मागील वर्षी वृक्षारोपण मोहीम त्यांनी उत्साहाने पार पाडली होती. यंदा त्यांनी स्वच्छता आणि संवर्धनाचा योग्य संगम साधला. महिलांनी दिलेल्या संदेशानुसार, ‘स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही, तर ही एक सामाजिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने स्वतःहून अशा उपक्रमात सहभागी व्हावे.’ या उपक्रमात रेखा टेकाम, रंजना विखे, जयश्री सोनुणे, शुभांगी मगर, स्वाती ढवळे, रोहिणी मेहेत्रे, नर्मदा तारक, पुष्पा मेहेत्रे, निर्मला राठोड या सर्व महिलांनी संघटितपणे हा उपक्रम यशस्वी करत, समाजात एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.