– डॉ. राजेंद्र शिंगणे, राहुल बोंद्रे, प्रा. नरेंद्र खेडेकर, संदीप शेळके यांची रणनीती ठरणार निर्णायक!
– ‘झेडपी’च्या सत्तेतही शेतकरी नेते रविकांत तुपकर ठरणार ‘किंगमेकर’?
– काँग्रेस महाआघाडीच्या ताब्यात भाजप झेडपीची सत्ता खेचणार का?
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम बुलढाणा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरही पडला असून, त्यामुळे आगामी निवडणूक चांगलीच राजकीय चुरशीची होणार आहे. यापूर्वी, काँग्रेसने जिल्हा परिषदेतील सत्ता वारंवार कायम ठेवली असून, त्यासाठी जिल्ह्याचे नेते मुकूल वासनिक यांचे सोशल इंजिनिअरिंग चांगलेच महत्वाचे ठरले होते. मागीलवेळी काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता मिळवली होती. आता शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले असून, ठाकरे यांची शिवसेना काँग्रेससोबत तर शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत आहे. तसेच, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासारखे सहकारातील वजनदार नेतृत्वदेखील महाआघाडीच्या माध्यमातून काँग्रेससोबत आहे. त्यामुळे महाआघाडीचे दिग्गज नेते पुन्हा एकदा भाजपला सत्तेपासून ‘वंचित’ ठेवण्यात यशस्वी होऊ शकतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार), प्रा.नरेंद्र खेडेकर (शिवसेना-ठाकरे सहसंपर्कप्रमुख), राहुल बोंद्रे (काँग्रेस अध्यक्ष) आणि संदीप शेळके (शिवसेना-ठाकरे जिल्हा समन्वयक) या नेत्यांनी जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्यासाठी गावपातळीवरील रणनीती निश्चित केली असली तरी, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भूमिकादेखील या निवडणुकीत महत्वपूर्ण राहणार आहे. या निवडणुकीनंतर तुपकर हे जिल्हा परिषदेच्या सत्तेतील ‘किंगमेकर’ ठरणार आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून २०१७ चा अपवाद वगळता काँग्रेसचीच सत्ता जिल्हा परिषदेत राहिलेली आहे. २०१७ मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून भाजपच्या उमाताई तायडे अडीच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष राहिल्यात. दुसर्या टर्मला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची युती होऊन पुन्हा काँग्रेसच्या मनिषा पवार या अध्यक्ष झाल्या होत्या.
दुसरीकडे, मागीलवेळी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसोबत असलेल्या महाआघाडीच्या जोरावर जिल्हा परिषदेची सत्ता कायम राखली होती. तर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवले होते. आता भाजप हा राज्यात व केंद्रात सत्तेत आहे. त्याचा फायदा निश्चितच भाजपला व त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदे गटाला होणार आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसवायचाच, असा भाजप नेतृत्वाचा निर्धार आहे. कॅबिनेटमंत्री आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाले पाटील, आ. संजय कुटे या भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड, माजी आमदार शशिकांत खेडेकर, डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार मनोज कायंदे व आता राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यावर या निवडणुकीची महत्वपूर्ण जबाबदारी येवून ठेपली आहे. ‘काही महत्वपूर्ण सर्वेक्षणानुसार, बुलढाणा जिल्हा परिषद ही भाजपच्याच ताब्यात जाण्याचे संकेत मिळत आहेत’. त्यामुळे काँग्रेससमोरील राजकीय आव्हान वाढले असताना, शेतकरी नेते रविकांत तुपकर हेदेखील या निवडणुकीत ठरावीक जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळत असल्याने, त्यांचा फटका महायुती की महाआघाडीला बसणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. तुपकरांनी विधानसभा निवडणुकीत तठस्थ भूमिका घेतली होती. परंतु, घाटावरील मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली होती. त्यामुळेच तुपकर हे विधानसभा निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरले होते. मेहकर, चिखली, सिंदखेडराजा, बुलढाणा, जळगाव जामोद या मतदारसंघात रविकांत तुपकर यांच्या भूमिकेचा विद्यमान आमदारांना फायदा झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ‘तुपकर फॅक्टर’ हे महत्वपूर्ण ठरणार आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ठरावीक जागा लढविणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. त्यादृष्टीकोनातून त्यांचे काही सहकारी कामालादेखील लागलेले आहेत. ‘जे शेतकरी चळवळीत एकनिष्ठ व सक्रीय आहेत, त्यांना तुपकरांची उमेदवारी मिळणार आहे. तर जे नेहमीच काठावर राहून तुपकरांच्या सोबत असल्याचे दाखवतात, तसेच यापूर्वी शेतकरी चळवळीच्या नावाखाली इतर पक्ष व संघटना हिंडून आले आहेत, त्यांनी कितीही दबाव आणला तरी तुपकर हे त्यांना खड्यासारखे बाजूला सारणार’ असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून कळते आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी निवडणुकीनंतर रविकांत तुपकर यांची भूमिका ही भाजप व काँग्रेससाठी निर्णायक ठरणार असून, जिल्हा परिषदेच्या सत्तेत तुपकर हेच ‘किंगमेकर’ ठरण्याची राजकीय चिन्हे आहेत. लोकसभेप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीतही शेतकरी-कष्टकरी मतदारांनी रविकांत तुपकर यांना साथ दिली तर, महायुती किंवा महाआघाडीच्यावतीने त्यांच्या संघटनेचा भविष्यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपददेखील मिळू शकते.

