– दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत २६ जूनरोजी पुण्यात होणार सन्मान सोहळा
– माजी राष्ट्रपती, माजी मुख्यमंत्र्यांसह, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यासह अनेक सिनेअभिनेत्यांना दिल्या गेला पुरस्कार!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सिद्धहस्त पत्रकार, लेखक व वक्ते तथा सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर पवार यांना यंदाचा शांतिदूत सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सदर पुरस्काराने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, स्व. श्रीमती पद्मश्री सिंधुताई सपकाळ, राही सरनौबत, शांताराम जाधव यांच्यासह सिनेअभिनेते प्रशांत दामले, भरत जाधव, अभिनेता सचिन खेडेकर, आजी-माजी आमदार-खासदार यांच्यासह क्रीडा, पत्रकारिता, प्रशाकीय सेवेतील अधिकारी व इतर मान्यवरांना या पुरस्काराने गौरविल्या गेलेले आहे. सिद्धेश्वर पवार हे रा ना पवार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, विदर्भ साहित्य संघाच्या मेहकर शाखेचे सचिव आहेत, स्वर्गीय अरविंद उमाळकर वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशपातळीवर कार्य करणार्या संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि ख्यातनाम सूत्रसंचलनकार व वक्तेदेखील आहेत.
कोरोना काळात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा होता, ही बाब सिद्धेश्वर पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कानावर घातली तेंव्हा त्यांनी जिल्ह्यासाठी १३ कॉन्सनट्रेटर दिले होते. ‘गोडवा’ ह्या गाजलेल्या वाचकप्रिय साप्ताहिक स्तंभाचे ते लेखक होय. उत्कृष्ट सूत्रसंचलन, प्रभावी वक्ते म्हणून सिद्धेश्वर पवार यांची ओळख असून, राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसह अनेक मुख्यमंत्री, मंत्री, मराठा क्रांती मोर्चाच्या सभांचे त्यांनी यशस्वी सूत्रसंचलन केलेले आहे. येत्या २६ जूनरोजी पुणे येथील एलओसी हॉस्पिटल नवी पेठ, एन.सी.फडके चौक निलायम टॉकीजच्याजवळ सदाशिव पेठ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी उपरोक्त पुरस्काराने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर पवार यांचा गौरव केल्या जाणार असल्याचे शांतीदूत परिवाराचे अध्यक्ष सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव यांनी कळविले आहे. सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता यामधील उल्लेखनीय कार्याबद्दल सिद्धेश्वर पवार यांना हा पुरस्कार देण्यात येणार असून, त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

