संतनगरी शेगावात मंगळवारी ‘शेतकर्‍यांचा एल्गार’!

admin 3 Min Read
3 Min Read

– कर्जमुक्ती व पीकविम्यासाठी शेतकर्‍यांच्या निर्णायक लढाईचे रणशिंग शेगावातून फुंकले जाणार!
– शेतकरी नेते रविकांत तुपकरांची तोफ धडाडणार; कर्जमुक्तीचा शब्द फिरविणार्‍या फडणवीस-पवार सरकारचे धाबे दणाणार!
– पीकविमा न मिळालेल्या शेतकर्‍यांनी पावत्या घेऊन हजर राहण्याचे आवाहन

शेगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती तसेच ज्या शेतकर्‍यांना अद्यापही पीकविमा मिळालेला नाही, त्या शेतकर्‍यांना त्वरित पीकविमा देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसह शेतकरी, कष्टकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी संतनगरी शेगाव येथे शेतकर्‍यांचा एल्गार आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी, दि. १० जूनरोजी संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकर्‍यांच्या इतर मागण्यांसाठी एल्गार पुकारणार आहेत. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे राज्यातील देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर एल्गार पुकारला आहे. राज्यभरात ठीकठिकाणी एल्गार मिळावे घेऊन शेतकर्‍यांना एकत्रित करून सरकारवर दबाव बनवण्याचे काम रविकांत तुपकर हे करीत आहेत. संपूर्ण कर्जमाफी तसेच शेतकर्‍यांचा हक्काचा पीकविमा तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावा, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरपाई तातडीने द्यावी, सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी, पिकांचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्या, सोयाबीनला आठ ते दहा आणि कापसाला १२ ते १४ हजार रुपये भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. नाशिक, निफाड, सिन्नर, संगमनेर, अहिल्यानगर, शिक्रापूर, शिरूर, कर्जत, जामखेड, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड आदी जिल्ह्यांमध्ये दौरा करून रविकांत तुपकर यांनी दि. २७ मेरोजी सिंदखेडराजा येथे आयोजित एल्गार मेळाव्यात सरकारच्या विरोधात तोफ डागली. त्यानंतर आता दि. १० जूनरोजी विदर्भ पंढरी, संतनगरी शेगाव येथे एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन येथे सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व ज्या शेतकर्‍यांना पीकविमा मिळाला नाही ‘त्या’ शेतकर्‍यांनी आपल्या पावत्या घेऊन शेगाव येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.


क्रांतीकारी शेतकरी संघटनेने संस्थापक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर वादळी दौरा करून शेतकरी एल्गार मेळावे घेतले आहेत. वारंवार धरसोड भूमिका घेऊन शेतकरी चळवळ राजकीय दावणीला बांधणारे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राजकीय अस्तानंतर? रविकांत तुपकर हेच राज्यात शेतकरी नेतृत्व म्हणून पुढे आले असून, त्यांच्या नेतृत्वात शेतकरी एकवटले आहेत. तुपकरांची वाढती ताकद पाहाता, राज्यातील देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारदेखील हादरले असून, संपूर्ण कर्जमुक्तीसाठी या सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. आजपर्यंत जीवावर उदार होऊन तुपकरांनी शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आंदोलने केलीत. शेतकर्‍यांच्या पदरात जे काही पडले ते फक्त अन् फक्त तुपकरांच्या आंदोलनाचाच परिपाक होता. त्यामुळे आतादेखील राज्य सरकारला शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी तुपकरांनी निर्णायक लढा उभारला असून, या लढ्याला निश्चितच यश येणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी पीकविमा व कर्जमुक्ती देण्यासाठी सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेले दिसून येत आहेत.

Share This Article
Exit mobile version