– लवकरच सातगाव फाटा- कुलमखेड व कुंबेफळ फाटा-टाकळी रस्त्याचे काम सुरू होणार
– भर पावसात केला बांधकाम खात्याचा निषेध, रास्ता रोकोनंतर काहीवेळातच लेखी आश्वासन
मेरा बुद्रूक (प्रताप मोरे) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पक्षाच्या कामगार सेलचे अध्यक्ष मनोजभाऊ दांडगे यांच्यासह सातगाव, कुलमखेड, कुंबेफळ व टाकळी येथील नागरिकांनी काल भरपावसात सातगाव फाटा ते कुलमखेड व कुंबेफळ फाटा ते टाकळी रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता धरणे आंदोलन केले व या आंदोलनादरम्यान वेळेत प्रशासनाचे अधिकारी उशिरा पोहोचल्याने काही वेळ रास्ता रोको आंदोलनसुद्धा पावसात करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन धरणे आंदोलन मागे घेण्यास विनंती केली व आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सातगाव, कुलमखेड, कुंबेफळ, टाकळी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
सदर रस्त्याच्या बाबतीत याआधी दिनांक १७ नोव्हेंबर २०२०, दिनांक २३ नोव्हेंबर २०२० व दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ रोजी वरील रस्त्याबाबत निवेदन दिलेले होते. सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी कामे मंजूर करण्यात आल्याचेसुद्धा सदर कार्यालयाकडून सांगण्यात आलेले होते. परंतु अद्याप सुद्धा या रस्त्याची कोणतेही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, शाळेतील मुलांना व जनतेला खूप मोठ्या अडचणींना या ठिकाणी सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनोजभाऊ दांडगे यांनी १८ जुलै २०२२ चे आपल्या निवेदनामध्ये परत एकदा या रस्त्याच्या दुरुस्तीच्या बाबतीत कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बुलढाणा यांना सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, याकरता निवेदन दिले होते. येणार्या पुढील पंधरा दिवसांच्या आत दोन्ही रस्त्याची दुरुस्ती करण्यात नाही आली तर दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी जनतेसह मनोजभाऊ दांडगे जनआंदोलन करतील असे या निवेदनात इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला होता व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असे नमूद केले होते त्या अनुषंगाने आज जनआंदोलन करण्यात आले.
सातगाव फाटा ते कुलमखेड व कुंबेफळ फाटा ते टाकळी रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या संदर्भातील जनआंदोलनाला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. ४ वाजेपर्यंत लोकशाही मार्गाने शांततेने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागातील निगरगट्ट अधिकारी, कर्मचारी यांनी आंदोलनाकडे जाणून बुजून कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी चिडून जाऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला व रोडवर येऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा निषेध असो अशा गगनभेदी घोषणा देऊन काही काळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु लागलीच पोलीस विभागाचे अधिकारी अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे सर्व सहकारी आंदोलन कर्त्यांची चर्चा करून समज काढून मध्यस्थी केली व बांधकाम विभागाच्या कर्मचार्याकडून आश्वासनाचे लेखी पत्र उपलब्ध करून दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तुर्त स्थगित केले, भविष्यात रस्त्याची नवीन बांधणी व दुरुस्ती न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा मनोजभाऊ दांडगे व त्यांचे सर्व सहकारी व गावकरी यांनी केली. सदर आंदोलन भर पावसात केले तसेच पावसातच रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, कुणीही स्वतः च्या जीवाची पर्वा न करता आंदोनलात सहभागी झाले.

रस्त्याची कामे पूर्णत्वाला जाईपर्यंत चैनशीर बसणार नाही : मनोज दांडगे

