– आ. श्वेताताई महाले यांची कृषीमंत्र्यांकडे तक्रार; शेतकरी बांधवांचे नुकसान अजिबात सहन करणार नाही!
– चिखलीत मोठा गोंधळ; शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकरी खवळले!
– उर्वरित बियाणे देण्याची सरनाईक, राजपूत यांची मागणी
– राज्यभरात शेतकर्यांची फसवणूक, घोडचूक कुणाची? दोषींवर कारवाई करा – विनायक सरनाईक
चिखली/ बुलढाणा (राजेश लोखंडे) – खरिप हंगामाकरिता १०० टक्के अनुदानावर प्रमाणित सोयाबीन बियाणे वितरण करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकर्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते. प्राप्त अर्जामधून दि. ३ जूनरोजी सोडत काढण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात ५ हजार २५८ शेतकर्यांची निवड झाली. चिखली तालुक्यातसुद्धा ८२४ शेतकर्यांची निवड झाली. या निवड झालेल्या शेतकर्यांना मेसेजदेखील प्राप्त झालेत. मात्र ऑनलाईन लॉटरी पध्दतीत ज्यांना ७५ किलोग्रॅम बियाणे मंजूर झाले, त्यांना ६६ किलोग्रॅमच मिळत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. ही बाब शेतकर्यांनी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यासह शेतकरी नेते विनायक सरनाईक यांना कळवली. त्यावर संतप्त झालेल्या आ. श्वेताताई महाले यांनी संबंधितांना चांगलेच फटकारले असून, मापात पाप खपवून घेणार नसल्याचा इशारा देत, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महाबीजवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनीदेखील चिखली तालुक्यातील चारही कृषी विक्रेत्यांकडे भेट देऊन पाहणी केली असता, महाबीजने मापात पाप केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना सरनाईक यांनी चांगलाच जाब विचारला. मात्र निवड प्रक्रिया वरिष्ठस्तरावरून राबविण्यात आल्याचे सांगून कृषी अधिकार्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. जेवढे बियाणे मंजूर झाले, तेवढेच शेतकर्यांना देण्यात यावे, शेतकर्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, असा पवित्रा सरनाईक, राजपूत यांनी घेतला. आमदार श्वेताताई महाले पाटील यांची आक्रमक भूमिका व शेतकरी नेते सरनाईक, राजपूत यांच्यासह शेतकर्यांनी घातलेला गोंधळ पाहाता, कृषी विभाग, महाबीजने नमती भूमिका घेत, ३० किलोग्रॅमच्या बियाणे बॅग उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्यानुसार, आता ज्या शेतकर्यांना ७५ किलोग्रॅम बियाणे मंजूर आहे, त्यांना ६६ किलोग्रॅम बियाणे मिळाले, त्यांना आता ७४ किलोग्रॅम बियाणे मिळणार आहे. मात्र ही चूक कुणाची याची चौकशी करण्यात यावी, शेतकर्यांची फसवणूक व हेळसांड करणार्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे.
कायद्याने बॅग फोडता येत नसल्याने गोंधळ…!
महाबीजने शेतकरी संख्येनुसार, कृषी विक्रेत्याकडे ३० किलो व २२ किलोची बॅग क्विंटलप्रमाणे प्रमाणे बियाणे दिले खरे. मात्र बॅग फोडता येत नसल्याने यामध्ये शेतकर्यांच्या संमतीनंतर ७५ किलोग्रॅमवाल्यांसाठी दोन बॅग २२ किलोग्रॅमच्या तर ३० किलोग्रॅमची एक बॅग म्हणजे त्या शेतकर्यांना आता ९ किलोग्रॅमऐवजी एका किलोग्रॅमचा फटका बसू शकतो.
काय काशी करायची ते करा उर्वरित बियाणे द्या – विनायक सरनाईक
जास्तीचे बियाणे मंजूर असतांना शेतकर्यांना ते कमी मिळत असल्याने अर्धे उभार बियाणे कृषी विभागाचे कर्मचारी यांच्या समक्ष वाटप झाले, हे शेतकर्यांनी लक्षात आणून दिल्यानंतरसुद्धा वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वाटप होत असल्याचे सांगितले जाते. मंजूर बियाण्यांच्या बॅग उपलब्ध करायच्या कुठून, असा प्रश्न महाबीज व कृषी विभागाला पडला आहे. निवडीचा सवाल शेतकर्यांनी केल्यास ही निवड पोर्टलने केली असे सांगितल्याने पोर्टल व्यक्तीच चालवतो की आपोआप चालते, असा सवाल शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी उपस्थित केला. काय काशी करायची ती करा, पण मंजूर असल्याप्रमाणे बियाणे द्या, अशी मागणी सरनाईक यांनी लावून धरली आहे.
– शेतकरी बांधवांचे नुकसान अजिबात सहन करणार नाही : आ. श्वेताताई महाले
महाराष्ट्र शासन अल्पभूधारक शेतकरी बांधवांना शंभर टक्के बियाणे अनुदान देत असले तरी बियाणे वितरणास जबाबदार ‘महाबीज’ कंपनी ‘मापात पाप’ करत असून, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना ९ किलोग्रॅम बियाणे कमी मिळत आहे. या गंभीर प्रकाराची लेखी तक्रार आज राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केली असून, ‘महाबीज’वर त्वरित कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील वीस गुंठे ते एक हेक्टर शेती असणार्या शेतकर्यांसाठी महाराष्ट्र बियाणे अनुदान योजना राज्य शासनाने मंजूर केलेली आहे. यात तूर, मूग, उडीद, सोयाबीनचे सुधारित व प्रमाणित बियाणे शंभर टक्के अनुदानावर शेतकर्यांना दिले जाते. यामुळे सुधारित व दर्जेदार बियाणे उपलब्ध होते. उत्पादनात वाढ होते व शाश्वत शेतीला चालना मिळते. तसेच अल्पभूधारक शेतकरी प्रगत शेतीकडे वळतात. या योजनेत हेक्टरी ७५ किलोग्रॅमचे सोयाबीनचे बियाणे दिले जाते. हे बियाणे वितरणाची जबाबदारी महाबीजची आहे. महाबीज त्यांच्या वितरकांद्वारे शेतकर्यांना बियाणे पुरवते. बियाणे पॅकिंगसाठी केंद्र शासनाचे काही निर्देश आहेत. सोयाबीन बियाणे पॅक करताना २२, २५ व ३० किलोग्रॅम असे प्रतिबॅग प्रमाण असावे असे केंद्राचे निर्देश आहेत. असे असूनही बुलढाणा जिल्ह्यात महाबीजकडून शेतकर्यांना सरसकट २२ किलोग्रॅमची बॅग दिली जात आहे. त्यामुळे ७५ किलोग्रॅम बियाण्यासाठी पात्र असलेल्या शेतकर्यांना फक्त ६६ किलो बियाणे मिळत आहे. त्यामुळे ९ किलो बियाणे कमी मिळत आहे. चिखली तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी ही तक्रार आ. श्वेताताई महाले यांच्याकडे केली असता, या तक्रारीची गंभीर दखल घेऊन त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना लेखी निवेदन दिले आहे. शेतकरी बांधवांचे नुकसान कुठल्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशाराही आ. श्वेताताई महाले यांनी दिला आहे.
६० किलोग्रॅम बियाणे मंजूर असणार्यास १६ किलोग्रॅमचा फटका!
महाबीजकडून विक्रेत्याकडे देण्यात आलेल्या ३० किलोग्रॅमच्या बॅग संपल्याने ज्या शेतकर्यांला ६० किलोग्रॅम अनुदानित बियाणे मंजूर झाले, त्याला २२ किलोग्रॅमच्या दोन बॅग दिल्या जात असल्याने त्याला ४४ किलोग्रॅम बियाणेच दिले जात असल्याने त्या शेतकर्यांना १६ किलोग्रॅम बियाणे कमी मिळत आहे. इथेच जर विक्रेत्याकडे ३० किलोग्रॅमची बॅग उपलब्ध असती तर त्याला २ बॅग दिल्यास बरोबर ६० किलोग्रॅम बियाणे मिळाले असते. यावर उपाययोजना करण्यासाठी महाबीजने तातडीने ३० किलोग्रॅमच्या बॅग विक्रेत्यांना उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून मापात पाप होणार नाही, अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे.

