– वृक्ष मित्र व्यक्ती – संस्थांचा सन्मान; वृक्षारोपणास प्रतिसाद
आळंदी (अर्जुन मेदनकर) : नगरेची रचावी ! जलाशये निर्मावी ! महावने लावावी ! नानाविध !! या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संत वचना प्रमाणे सिध्दबेटात जागतिक पर्यावरण दिना निमित्त येथील वैभव असलेल्या पुरातन संत लीलाभूमीत केळगाव ग्रामपंचायत, आळंदी नगरपरिषद, जनहित फाउंडेशन, चऱ्होली ग्रामपंचायत, आळंदी देवस्थान सह विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती, पदाधिकारी यांचे वतीने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचे हस्ते पुरातन अजानवृक्ष पुजा हरिनाम गजरात करण्यात आली. या उपक्रमात आळंदी जनहित फाउंडेशन सहयोगी संस्था यांचे माध्यमातून सिध्दबेटात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्रमदानातून वृक्षारोपण मोहिमेस जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरणाचे संवर्धन,आणि माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत स्वच्छतेची शपथ, शिव वंदना घेत पर्यावरण दिन वृक्षारोपण करीत साजरा करण्यात आला.
आळंदी नगर परिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन स्वच्छ सर्वेक्षण, माजी वसुंधरा ६ .० अंतर्गत पर्यावरण दिनी सिद्धबेट मध्ये आळंदी नगरपरिषद महिला बचत गट, हॅपीनॉल फाउंडेशन, पत्रकार बांधव यांच्या वतीने १०१ देशी रोपांचे वृक्षारोपण करून वसुंधरेची हरित शपथ घेऊन स्वच्छता अभियान राबवित जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी नागरिक सेवाभावी संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचेसह उपस्थितांचे हस्ते वृक्षारोपण आणि सन्मानपत्र वाटप करण्यात आले. सर्वांनी फक्त एक दिवस पर्यावरण दिन साजरा न करता रोजच पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. राज्य शासन सिद्धबेटचा विकास करीत आहे. त्यांचे समवेत काम करून या भागातील पुरातन वैभव अजानवृक्ष संवर्धन, स्वच्छता व सुशोभीकरण हे सेवाभावी सेवा कार्य आपण करत आहोत. सिद्धबेटाचे अध्यात्मिक महत्व असतानाच इथे येणारे वारकरी संप्रदायातील अभ्यासासाठी येणारे विद्यार्थी आणि भाविक यांना सुंदर नैसर्गिक वातावरण निर्माण करून देण्यासाठी देशी झाडांची ओळख वाढवण्यासाठी अध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेली पंचवाटीका उभी करण्यात आली आहे. शासनावर अवलंबून न राहता आपल्या पुढील पिढीसाठी प्रत्येकाने झाडे लावणे ,नदी स्वच्छता आणि प्लास्टिक कचरा वेगळा करून देणे ही आपली जबाबदारी मानून प्रत्येकाने सेवा कार्यात सहकार्य केले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले. संयोजन अर्जुन मेदनकर, राजेंद्र घुंडरे, दत्तात्रय डफळ, रोहिदास कदम यांनी केले. कैवल्य टोपे यांनी सामूहिक शिववंदना घेत पर्यावरण दिनाचे कार्यक्रमाची सांगता केली.

