ट्रकला ट्रॅव्हल्सची मागून धडक; चालक-वाहक जागीच ठार!

admin 3 Min Read
3 Min Read

– राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगरजवळील दुर्घटना; ३२ प्रवासी जखमी
– सुरत ते मेहकर जाणारी शिहोरी ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात; जखमीत बुलढाणा जिल्ह्यातील प्रवासी!

बुलढाणा/जळगाव (राजेश लोखंडे) – सुरतवरून मेहकरकडे निघालेल्या शिहोरी कंपनीच्या ट्रॅव्हलसचा राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगरजवळ दि. ४ जूनरोजी सकाळी ५ वाजता समोर रांगोळी घेऊन जाणार्‍या ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने मागून ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स ट्रकला मागून धडकून झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि वाहक यांचा जागीच मृत्यू झाला, तर ३२ प्रवासी जखमी झाले. सदर हा अपघात इतका गंभीर होता की, जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅव्हल्सची कॅबीन तोडून मृतदेह बाहेर काढावे लागले. जखमींमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश आहे.

सविस्तर असे, की मंगळवारी रात्री सुरतवरून मेहकरकडे निघालेली शिहोरी कंपनीची ट्रॅव्हल्स (क्र.एआर२०- ९५९५) बुधवारी सकाळी पाच वाजेच्यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगरजवळील कोथळी गावाजवळील उड्डाणपुलावरून येत असताना समोर रांगोळी घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक आरजे ०९- जीबी ३२४९) यांचे टायर पंक्चर झाल्याने मागून आलेल्या शिहोरी ट्रॅव्हल्सचा चालक देविदास पन्नालाल लोहार (वय ३८ वर्ष, रा. सुरत, गुजरात) याला डुलकी लागल्याने आणि ट्रॅव्हल्सचा वेग ताशी १२० किलोमीटर प्रतिसासचा असल्याने सदर ट्रॅव्हल्स ट्रकला मागून धडकली आणि या धडकेत ट्रॅव्हल्स चालक देवीदास पन्नालाल लोहार आणि वाहक भगवतीलाला रेवाशंकर (वय ३० वर्षे, रा. मांदला, उदयपूर, राजस्थान) या दोघांचा कॅबीनमध्ये दबून मृत्यू झाला. तर ट्रॅव्हल्समधील ३२ प्रवासी जखमी झाले. सदर ट्रॅव्हल्समध्ये ५५ ते ६० प्रवासी होते, यातील बहुतांश प्रवासी हे बुलढाणा जिल्ह्यातील होते. या अपघाताची माहिती मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळताच ते सहकार्‍यांसह अपघातस्थळी येऊन जखमी प्रवाशांना मुक्ताईनगर आणि मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी पोलिसांनी हलविले. या अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस करीत आहेत.


रात्री ८ वाजता शिहोरी ट्रॅव्हल्स सुरतवरून मेहकरकडे प्रवासी घेऊन निघाली, सकाळी मी सकाळी साखर झोपेत असताना जाग आली तेव्हा चालक आणि वाहक हे भुसावळ येथे साड्यांचे पार्सल उतरवित होते, पार्सल उतरवून झाल्यावर सदर ट्रॅव्हल्स पुढील प्रवासासाठी निघाली नंतर पुन्हा झोप लागली असता, अचानक मोठा आवाज झाला, पाहतो तर ट्रॅव्हल्स ट्रकला मागून धडकली होती. बसमध्ये एकच कल्लोळ उडाला आणि जो तो मिळेल त्या जागेतून बाहेर पडू लागले. ट्रॅव्हल्सचे चालक आणि वाहक दोघेही ट्रॅव्हल्समध्ये अडकलेले होते आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता, असा घटनाक्रम कय्यूम शहा, ट्रॅव्हल्समधील प्रवासी यांनी सांगितला.

Share This Article
Exit mobile version