अरे बापरे! खामगावमधील घाटपुरीतील गट नं. 55/2 मधील ‘आदर्श ज्ञानपीठ’च गेले चोरीला??

admin 3 Min Read
3 Min Read

– आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुलच्या संचालकांचा अनोखा प्रताप!
– शाळेचा पत्ता दुसराच आणि शाळा भरविल्या जाते तिसर्‍याच ठिकाणी!
– गटामध्ये शेती, संचालक घेत आहेत दुहेरी लाभ, शिक्षण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

बुलढाणा/खामगाव (राजेश लोखंडे) – खामगाव येथील घाटपुरीमधील स्वयंअर्थसहाय्यित आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज हे गट नं ५५/२ मध्ये फक्त कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. या शाळेची मान्यता पत्रातसुध्दा पत्ता चुकीचा आहे. गट ५५/२ हे घाटपुरी शिवारात येत असून, या गटात संचालकाची शेती असल्याचे दिसून येत आहे. आणि शेतीवर ते पीकविमा नुकसान भरपाईसारखा लाभसुध्दा घेत आहेत. त्यामुळे संचालक शिक्षण विभागाची दिशाभूल करत आहेतच आणि त्यासोबतच महसूल विभागालासुध्दा फसवित असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे गट नं ५५/२ मधील आदर्श विद्यालय चोरीला गेले की काय? अशी मिस्किल चर्चा खामगाव शहरात सद्या जोरात सुरू आहे.

खामगाव शहरातील घाटपुरी नाका, गोपाळ नगर, जोशी नगरसह शहरातील इतर भागातील विद्यार्थी आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजमधे शिक्षण घेत आहेत. स्वयंअर्थसाहय्यित शाळा स्थापना व विनियमन अधिनियम जॉटर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज २०१२ अंतर्गत या शाळेला मान्यता प्राप्त झालेली आहे. परंतु महाराणा प्रताप शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक शिक्षण विभागाची फसवणूक करीत आहेत. कागदोपत्री शाळा ही गट ५५/२ मधे दाखविली असून, हा गट खामगाव शहरात नसून घाटपुरी शिवारात आहे. खामगाव शहारातील ५५/२ हा गट घाटपुरी रोडवर नाही, त्यामुळे मान्यता पत्रात दिलेला पत्ता पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुल गट नं ५५/२ घाटपुरी रोड मौजे खामगाव ता. खामगाव, जि. बुलडाणा अशा प्रकारचा पत्ता मान्यता पत्रात दिलेला आहे. हा पत्ता खामगाव शहरात कुठेही अस्तित्वात नाही. याबाबत शोध घेतला असता, गट नं ५५/२ हा घाटपुरी शिवारात येत असून, यामधे संचालक कविश्वरसिंह कन्हैयासिंह राजपूत यांचे क्षेत्र ०.८१.०० आणि आकार १.८० असे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे शाळेची मान्यता घेण्यासाठी जी जागा दाखविण्यात आली आहे ती मुळात घाटपुरी शिवारात येते. या जागेवर आजरोजी शेती केल्या जात असून, शासनाची दुहेरी फसवणूक केल्या जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नरेश भारसाकळे यांनी संबंधित विभांगाकडे रितसर तक्रार केली आहे. परंतु, शिक्षण विभाग व महसूल विभाग फसवणूक झालेली असतांनाही सदर संचालकांवर कारवाई करण्यास धजावत नसल्याने नेमक गौडबंगाल काय आहे, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष, सचिव व प्राचार्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

Share This Article
Exit mobile version