एसटी कर्मचार्‍यांना खूशखबर, महागाई भत्त्यात ७ टक्क्याने वाढ!

admin 1 Min Read
1 Min Read

– एसटी महामंडळावर दरमहा १९ कोटींचा बोजा; महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवर!

मुंबई (प्रतिनिधी) – राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांना मूळ वेतनावर सद्या ४६ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. तर आता राज्य परिवहन कर्मचारी आणि अधिकारी यांना जून- जुलै २०२५ च्या वेतनापासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. म्हणजेच एसटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्यात ७ टक्के वाढ झाली. महागाई भत्ता वाढीमुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे १९ कोटींचा आर्थिक भार वाढणार आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली.

एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे. महागाई भत्याची २०१८ पासूनची थकबाकी प्रलंबित आहे. न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे आता महागाई भत्ता ५३ टक्के लागू केला आहे. यासोबतच एप्रिल २०१६ ते २०२१ पर्यंतचे घरभाडे आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी प्रलंबित आहे, तेदेखील देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, जाचक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती रद्द करा. तसेच एसटी चालकांचा दोष नसतानादेखील आरटीओ विभागाकडून करण्यात आलेली दंडात्मक कारवाईदेखील रद्द करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.

Share This Article
Exit mobile version