– राज्यातील महिलांच्या गंभीरप्रश्नी अॅड.जयश्रीताई शेळके, सुषमा अंधारेंच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
– वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करावे, बेपत्ता महिला व मुलींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – राज्यातील महिलांच्या ज्वलंतप्रश्नी महायुतीच्या महिला नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची आज भेट घेतली. राज्यपालांनी मोजकाच वेळ दिला होता. परंतु, या महिला नेत्यांनी प्रश्नच इतक्या गांभिर्याने मांडले की तब्बल तासभर चर्चा चालली. याप्रश्नी राज्य सरकारला योग्य ते निर्देश देऊ, अशी ग्वाही राज्यपालांनी दिली. शिवसेना प्रवत्तäया प्रा. सुषमा अंधारे, अॅड. जयश्रीताई शेळके, माजी महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या रोहिणीताई खडसे, विद्या चव्हाण, काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड आदींचा सहभाग होता. महिला व मुली बेपत्ता होत असल्याबाबत जयश्रीताई शेळके यांनी गंभीरपणे चिंता व्यक्त करत, याप्रश्नी राज्यपालांचे लक्ष वेधले व राज्य सरकारला या बेपत्ता महिला व मुलींच्या शोधासाठी विशेष मोहीम व विशेष पथक स्थापन्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अंधारे यांनी सांगितलं की, या भेटीमध्ये चाकणकर हा व्यक्तीगत पातळीवरचा विषय नव्हता, त्याचबरोबर इतका छोटा विषय घेऊन राज्यापालांना भेटण्याचं काहीही कारण नाही. जे मुद्दे आम्ही आज या चर्चेवेळी मांडलेले होते. त्यातील सर्वांत महत्त्वाचा पहिला मुद्दा वैष्णवी हगवणे केसमध्ये खूप राजकीय हस्तक्षेप आहे. हगवणे केसमधील ज्या जालिंदर सुपेकरांचं नाव आम्ही वारंवार घेत होतो, आणि त्यांचं पदावनती झाली, त्या जालिंदर सुपेकर यांचे सख्खे मेव्हणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलिस स्टेशनला पीआय आहेत. शशिकांत चव्हाण यांच्याकडेच हगवणे ज्या चोंधेच्या थार गाडी घेऊन गेले होते, त्या चोंधेंच्या दोन सुनांच्या केसेस होत्या. याच शशिकांत चव्हाण यांच्या अरबो रूपयांच्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी साईट्स सुरू आहेत. त्यामुळे जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण या दोघांची चौकशी करण्यात यावी, याबाबतची चर्चा आम्ही राज्यपालांसोबत केली, अशी माहिती सुषमा अंधारेंनी दिली आहे. त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावं. या प्रकरणात जालिंदर सुपेकर आणि त्यांचा मेव्हणा शशिकांत चव्हाण यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती यावेळी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दिली आहे.

