पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपात; पत्नीच्या आरोपाने खळबळ!

admin 3 Min Read
3 Min Read

– पहलगामचे ‘सिंदूर’ दिसले माझेही पुसले गेले त्याचे मोल नाही का?; देवेंद्र फडणवीसांना उद्देशून लिहिली पोस्ट!
– भाजप कार्यकर्ते व आ. संजय कुटेंचे चालक पंकज देशमुख घातपाताची सीआयडी चौकशीची मागणी

बुलढाणा/जळगाव जामोद (राजेश लोखंडे) – जळगाव जामोद येथील भाजपचे कार्यकर्ते तथा भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वाहन चालक पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून, त्यांचा घातपात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी केला आहे. पहलगामचे सिंदूर दिसले माझेही पुसले गेले त्याचे मोल नाही का? असा सवाल करत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. तसेच, पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणीदेखील त्यांनी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक पंकज देशमुख यांचा मृतदेह दि. ३ मे २०२५ रोजी जळगाव जामोद येथील बर्‍हाणपूर रोडवरील एका शेतात आढळून आला होता. त्यांचा मृतदेह रूमालाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता, तसेच त्यांच्या हातांवर व पायांवर जखमाही आढळल्या होत्या. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले होते. त्याचवेळी हा प्रकार संशयास्पद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबत, पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी अमरावतीचे पोलिस महानिरीक्षक व बुलढाणाच्या पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून, ही आत्महत्या नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच, माझ्या पतीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणीदेखील सुनीता देशमुख यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून, जळगाव जामोद पोलिसांवर माझा विश्वास नाही, असेदेखील सुनीता देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.


सुनीता देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून भावनिक पोस्ट लिहिली आहे. सुनीता देशमुख यांनी लिहिले की, ‘माझे सिंदूर आमच्याच गावात पुसले गेले. मला न्याय हवा. पहलगामचे सिंदूर दिसले आणि जे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद गावात पुसले गेले त्याचे काय? माझे सिंदूर सिंदूर नाही का? माझ्या सिंदूरचे काही मोल नाही का? माझे मिस्टर गेली वीस वर्षांपासून भाजप कार्यकर्ते आहेत. भाजप कार्यकर्त्याला न्याय मिळेल का? ३ मे २०२० रोजी माझ्या पतीचे निधन झाले. माझी मुलगी फक्त अकरा वर्षांची आहे आणि माझा मुलगा आठ वर्षांचा आहे. त्यांना न्याय मिळेल का? पहलगाम तर दूरचा विषय आहे, गावातही जनता सुरक्षित नाही’.
————–

Share This Article
Exit mobile version