– बुलढाण्यात रविकांत तुपकर, संदीपदादा शेळके यांच्या आव्हानांचा अजितदादा, शिंदे गटाला करावा लागणार सामना!
– शिंदे गट व अजित पवार गटांत राहणार राजकीय चढाओढ!
बुलढाणा (बाळू वानखेडे/राजेश लोखंडे) – तब्बल दोन दशकांपैकी बहुतांश वर्षे सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भावर आपली राजकीय पकड निर्माण करता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तर विदर्भातील आमदारांची संख्या चक्क ११ वरून सहावर आली. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष मात्र ३९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार कंबर कसली असून, वेळप्रसंगी स्वबळ अजमाविण्याचीदेखील तयारी चालवली आहे. तथापि, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांत मात्र राष्ट्रवादी काँग्रेससमोर महायुतीअंतर्गत शिंदे गट व क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांचे राजकीय आव्हान राहणार आहे. बुलढाण्यात तर शिंदे गट व अजित पवार गटाला शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके यांच्या राजकीय व्यूहरचनेला सामोरे जावे लागणार आहे. ग्रामीण भागात संदीपदादा शेळके यांनी लावलेल्या राजकीय सापळ्यात किती जागा सापडतात?याची शिंदे गटाला आतापासूनच धास्ती निर्माण झाली आहे. महायुती झेडपी व पंचायत समितीला एकत्र लढली तर राष्ट्रवादीला जागावाटपाचे मोठे आव्हान राहणार असून, दुसरीकडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवाराला पराभूत करून जिल्हा परिषदेत पोहोचणार आहेत. कारण, शेतकरी, सहकार व स्थानिक राजकारण हा दोघांमधला कॉमन राजकीय फॅक्टर आहे.
दुसरीकडे, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके व जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी शांतपणे ग्रामीण भागात पक्ष संघटना मजबुतीवर लक्ष केंद्रीत केले होते. शिंदे गट व अजित पवार गटाला एकाचवेळी शह देण्यासाठी या दोन नेत्यांनी आखलेली रणनीती आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यशस्वी होईल, अशी चिन्हे आहेत. बुलढाण्यात अजित पवार गटाची ताकद पाहिजे तशी सध्यातरी दिसत नाही. अजित पवार गटाचे सिंदखेडराजा मतदारसंघातून मनोज कायंदे हे जिल्ह्यातून एकमेव आमदार असले तरी, विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील वेळेवरील राजकीय परिस्थितीवर ते निवडून आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत सिंदखेडराजात त्यांचा सामना रविकांत तुपकर, राजेंद्र शिंगणे व संदीपदादा शेळके व प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या राजकीय व्यूहरचनेशी होणार आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत येथून रविकांत तुपकर यांना मोठा लीड मिळाला होता. खामगावात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे काही शिलेदार राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले असून, माजी आमदार सानंदा यांनी जर अजित पवार गटात प्रवेश केला तर त्याचा फायदा महायुतीला होवू शकतो, पण स्वबळावर लढले तर मात्र भाजपचा सुंठीवाचून खोकला जाणार आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी अजित पवार गटापेक्षा रविकांत तुपकर यांची ताकद जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे. महायुती ही निवडणूक आपापल्या पक्षांना घेऊन एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी, कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने नाराजी ओढवणे जिकरीचे असते. त्यामुळे काही ठिकाणी स्बबळसुध्दा आजमावले जाणार आहे. जिल्हयात भाजप, शिंदे गट, काँग्रेस पक्षाचीही ताकद आहे. वंचित बहुजन आघाडीनेही निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, भाजप सोडून युती करा, असे फर्मान अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी सोडले आहे. त्यामुळे वंचित आघाडीची भूमिकाही महत्वपूर्ण राहणार आहे. खामगाव, जळगाव जामोद, शेगाव, संग्रामपूर आदी तालुक्यांत वंचित आघाडीची ताकद आहे हेदेखील नाकारून चालणार नाही.
सद्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा जिल्ह्यात एकही जिल्हा परिषद सदस्य नाही. तथापि, विनायक सरनाईक, डॉ. टाले, सहदेव लाड यांच्यासारखे जनमाणसातील नेतृत्व जिल्हा परिषदेत पोहोचण्याची यंदा दाट शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपने विजयराज शिंदे यांना जिल्हाध्यक्ष करुन कामाला सुरुवात केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटात अद्याप सामसूम दिसत असून, काँग्रेस ही जिल्ह्यात भाकरी फिरवणार असल्याचे काँग्रेसच्या एका प्रदेश पदाधिकार्याने खासगीत बोलताना सांगितले आहे. कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, महागाई यामुळे शेतकरी हे या निवडणुकीत सत्ताधार्यांविरोधात कौल देण्याची शक्यता आहे.
भाजपचीदेखील स्वबळाची चाचपणी!
नुकत्याच आटोपलेल्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौर्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर घेतलेल्या बैठकांमधील चर्चेसंदर्भातील माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकांच्या माध्यमातून मुंबई, ठाणे व पुणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपची चाचपणी सुरु केली आहे. अमित शाह यांनीच राज्यातील नेत्यांना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबद्दलचे संकेत दिल्याचेही खात्रीशीर वृत्त आहे.

