– ८७,३४३ कोटींच्या प्रकल्पाचे वेगाने काम सुरू; सरकारकडून १२३२ कोटी रूपये वर्ग
– हवाई सर्वेक्षण आणि पाहणीचे काम सुरू; दहा वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याची आशा!
बुलढाणा/मुंबई (पुरूषोत्तम सांगळे) – भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेचे पाणी बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (पूर्णा) नदीत आणून तब्बल ३.७५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वांकांक्षी प्रकल्प वेगाने आकार घेत असून, हवाई सर्वेक्षण व पाहणीचे काम सुरू झाले आहे. ८७,३४३ कोटींच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारने १२३२ कोटी रूपये नुकतेच वर्ग केले असून, डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर)नुसार कामाला गती देण्यात आलेली आहे. या प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ३८ हजार २१४ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असून, खडकपूर्णा प्रकल्पालादेखील या पाण्याचा फायदा होणार असल्याने चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील हे स्वतः या प्रकल्पाच्या कामावर जातीने लक्ष ठेवून आहेत.
- ₹88,000 कोटींचा वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प!
- विदर्भात 10 लाख एकर शेतजमिनीला कायमस्वरूपी ओलिताखाली आणण्याचे काम
- 550 किलोमीटर असलेली नवी नदी!; विदर्भातील दुष्काळ कायमचा हद्दपार होणार
- भविष्यातील औद्योगिकीकरणासाठी मुबलक पाणी मिळणार; 3 ते 4 वर्षात लाभ मिळायला सुरुवात होणार!
बी.एच.टेक या कंपनीव्दारे नदीजोड प्रकल्पाचे हवाई सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यासह जिल्हाभर विमानाद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प हा दोन टप्प्यात करण्यात येत असून, त्याच्या सर्वेक्षणाचे काम बी.एच टेक कंपनीने हाती घेतले आहे. पश्चिम विदर्भातील कोरडवाहू जमिनीला सुजलाम सुफलाम करून विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांत आर्थिक सुबत्ता आणण्यात मैलाचा दगड ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा मुद्दा अखेर यंदाच्या अर्थसंकल्पात मान्य झाला आहे. तत्त्वतः मंजुरीच्या पुढचे पाऊल टाकतांना राज्य सरकारने विमान सर्वेक्षण आणि अन्वेषणासाठी जिल्हानिहाय निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर येथील बी. एच. टेक या कंपनीव्दारे विमानाव्दारे सर्वेक्षण केले जात आहे.

