– बुधवारीही पावसाचा जोर कायम राहणार; शेतकर्यांची चिंता वाढली!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार दणका दिला. बुलढाणा जिल्ह्यातही सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. उद्या, बुधवारीही पावसाचा हाच जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे. सद्या अंदमान-निकोबार बेटांवर दाखल झालेला मान्सून पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, बुलढाण्यासह राज्यात मात्र पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे.
केवळ बुलढाणाच नाही तर मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक , छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर अशा प्रमुख जिल्ह्यांसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने झोडपले आहे. काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मेहकर, सिंदखेडराजा, लोणार, चिखली या तालुक्यांनादेखील पावसाने झोडपले असून, सिंदखेडराजा येथील महासत्संग सोहळ्यातही पावसाचे पाणी शिरल्याने भाविकांना पावसात उभे राहून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा लागला. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा, डोणगाव, खामगाव आदी भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. देऊळगाव साखरशा भागात शेकडो एकरातील भुईमूग शेंगा भिजल्या असून, मेहकर तालुक्यातील वांगदेव नदीला पूर आला होता. पेनटाकळी नदीदेखील चांगलीच वाहू लागली आहे.

