– ‘टीईटी’ परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावे!
औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे कनेक्शन आता सिल्लोडपर्यंत पोहचले आहे. या ‘टीईटी’ घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बोलताना सत्तार यांनी बदनामी करण्यासाठी कट रचला जातोय असा आरोप केला आहे. ‘आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणार्यांना फासावर लटकवा, चुकीची माहिती देऊन बदनामी करणार्यांवर कारवाई करावी’ अशी मागणी आ. सत्तार यांनी केली आहे. सत्तार हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. हा घोटाळा पुढे आल्याने त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अब्दुल सत्तार यांनी आरोप फेटाळले
अब्दुल सत्तार यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मी जी यादी पाहिली ती २०१९ मधील आहे. माझ्या मुलींनी परीक्षा २०२० मध्ये दिली होती. त्यात त्या अपात्र ठरल्या होत्या. मग या यादीत नाव येण्याचा प्रश्नच नाही. गेल्या चार वर्षांमध्ये जर माझ्या संस्थेकडून या संदर्भात शिक्षण विभागाला एखादे पत्र जरी गेले असेल तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा, असे सत्तार यांनी म्हटले आहे. हा माझ्या बदनामीचा कट आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांची चौकशी करावी, अशी मागणीदेखील सत्तार यांनी केली आहे.

