– झेडपी गट व पंचायत समिती गणांचीही फेररचना करावी लागणार!
– दिवाळीपूर्वीच उडणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार!
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ मेरोजी दिले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने सक्रीय होत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेरप्रभाग रचना करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच, जिल्हा परिषदेच्या गटांची व पंचायत समित्यांच्या गणांचीही फेररचना राज्य सरकारला करावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही निवडणूक १९९४ ते २०२२ पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती, त्यानुसार घेण्याचे आदेश दिलेत. विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी चार आठवड्यांच्याआत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार, हे निश्चित झाले आहे.
६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. ‘चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या’ असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ठराविक वेळेत घ्या. उर्वरित वादाचे मुद्दे टाळा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
——–

