– शिवसेना (ठाकरे) पक्षाने ट्रॅक्टर मोर्चा काढला अन् प्रशासनावर दबाव वाढला!
– मेहकर मतदारसंघातील एक लाख शेतकर्यांना १२८ कोटींचा पीकविमा मंजूर : आ.सिध्दार्थ खरात
– शेतकरी नेते रविकांत तुपकर, शिवसेना (ठाकरे) पक्ष यांच्यामुळेच शेतकर्यांना पीकविमा; पण श्रेय घेण्यासाठी आता चढाओढ!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने २ मेरोजी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचा धसका घेत प्रशासनावर प्रचंड दबाव आला. परिणामी, शासनाने जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी ६३५ कोटी रुपये पीकविमा मंजूर केला आहे. मेहकर मतदारसंघातील १ लाख शेतकर्यांसाठी १२८ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्याचे वितरणसुद्धा सुरू झाले आहे, अशी माहिती मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज, दि. ८ मेरोजी मेहकर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, पीकविम्याचे श्रेय घेण्यासाठी नेहमीप्रमाणे अनेकजण जागे झाले असले तरी शेतकरी नेते रविकांत तुपकर, शिवसेना (ठाकरे) पक्ष यांच्या आक्रमक भूमिकेपुढे राज्य सरकारला झुकावे लागले असून, या बाबीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत फटका बसू नये, म्हणूनच फडणवीस सरकारने हा पीकविमा दिला असल्याची राजकीय चर्चा जिल्ह्यात होत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीकविम्यासाठी मुंबईत जाऊन जोरदार राडा केला होता. तसेच, शिवसेना (ठाकरे) पक्षानेही जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात भव्य ट्रॅक्टर मोर्चा जिल्हा कचेरीवर नेला होता. त्यामुळे राज्यातील फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली होती. या बाबीचा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत फटका बसण्याची शक्यता पाहाता, घाबरलेल्या फडणवीस सरकारने तातडीने पीकविम्याची रक्कम अदा करण्यास सुरूवात केली आहे. रविकांत तुपकर व संदीपदादा शेळके यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच शेतकर्यांना पीकविमा मिळत असल्याची शेतकर्यांची भावना आहे. त्यासाठी कुणी कितीही श्रेय लाटण्यचा प्रयत्न केला तरी, शेतकरीवर्गाला सर्व वस्तुस्थिती माहिती आहे, अशीही चर्चा ग्रामीण भागातून ऐकायला येत आहे.

