– निकाल ऑनलाईन पाहता येणार, गुणपत्रिकेची प्रिंटही काढता येणार
– दहावीला निकाल १५ मेपूर्वी लागणार?
पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील इयत्ता बारावीचा निकाल उद्या (सोमवारी) दि. ५ मेरोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) निकालासाठी अधिसूचना जारी केली असून, या अधिसूचनेनुसार, बोर्डाच्यावतीने घेण्यात येणार्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वरून गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहता येईल. तर 6 मे मंगळवारपासून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे. दरम्यान, इयत्ता दहावीचा निकालदेखील १५ मेपूर्वी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेण्यात आल्या होत्या. परीक्षेसाठी सुमारे ८.१ लाख विद्यार्थी, ६.९ लाख विद्यार्थिनी आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. त्यानंतर विद्यार्थी या माहिती प्रिंटदेखील काढू शकतात. तसेच, डिजीलॉकर अॅपमध्ये डिजीटल रिझल्ट संग्रहीत करुन ठेवण्याची सोयदेखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
——-
या लिंकवर निकाल पाहू शकणार आहात
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. http://hscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
कसा पाहाल निकाल?
– सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
– होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्याला क्लिक करा.
– क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
दरम्यान, भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने म्हणजेच CISCE ने 30 एप्रिल रोजी ISC आणि ICSE बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. यामध्ये 99.64 टक्के मुले आणि 99.45 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आयएससी बारावीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत झाल्या होत्या, तर आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च 2025 या कालावधीत झाल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत 1.06 लाख विद्यार्थी बसले होते तर दहावीच्या परीक्षेत 2.53 लाख विद्यार्थी बसले होते.

