– शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणावरील स्वयंचलित गेट काढून नैसर्गिक सांडवानिर्मिती करा; शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट!
चिखली/बुलढाणा (राजेश लोखंडे) – येळगाव धरणाच्या सांडव्यात ८० स्वयंचलीत गेट जेव्हापासून बसवले, तेव्हापासून मुसळधार पाऊस झाल्यानंतर स्वयंचलित गेट एकाचवेळी पाण्याच्या दबावाने उघडले जाऊन पूरस्थिती निर्माण करतात. त्यामुळे बुलढाणा, चिखली, मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्यांच्या शेतात नदीचे पाणी शिरून शेतीपिकांचे व शेतीचे अतोनात नुकसान होते. यामधे दरवर्षी जमीन खरडून जाणे व पिकाचे नुकसान होत असते. या प्रकरणी मागीलवर्षी शेतकरी नेते रविकांत तुपकर व शिष्टमंडळाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयात पार पडली होती. तेव्हा यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश अजितदादांनी दिले होते. मात्र आता पावसाळा तोंडावर आला असतानासुद्धा धरणाला सांडवा तयार करण्यात आला नसल्याने भविष्यात शेतीपिकांचे नुकसान होणार, ही चिंता शेतकर्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी शेतकर्यांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिलेल्या निर्देशाची आठवण करून देत, स्मरणपत्राव्दारे मागणी केली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन शेतकर्यांसह छेडण्याचा इशारा विनायक सरनाईक, नितीन राजपूत, विलास वसू यांच्यासह शेतकर्यांनी दिला आहे.
बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पैनगंगा नदीवर येळगाव धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. सुरूवातीला धरणावरील सांडव्यावर स्वयंचलित गेट नव्हते. परंतु, अलीकडच्या काळात धरणाच्या सांडव्यावर स्वयंचलित गेट बसविण्यात आले. ज्यावेळी अतिवृष्टी होते व धरण क्षमतेपेक्षा जास्त भरण्याच्या मार्गावर येते, तेव्हा ८० स्वयंचलित गेट एकाचवेळी उघडतात. त्यामुळे गेटच्या खालून आणि वरतून पाण्याचा एकदम नदीपात्रात विसर्ग होतो. एकाचवेळी धरणफुटी समान आलेल्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे धरणाखालील येळगाव, सव, खूपगाव, वाडी ब्रम्हपुरी, किन्होळा, कोलारी, सवणा, सोमठाणा, दिवठाणा, बेलदरी, पेठ, उत्रादा, बोरगाव, दहीगाव, पांढरदेव, महीमळ, घानमोड – मानमोड या शिवारातील शेतीपिकांचे व शेतजमिनीचे अतोनात नुकसान होते. दरवर्षी हा हाहाकार माजत असतो. मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून जात आहेत. ही समस्या जेव्हापासून सांडव्यावर गेट बसविण्यात आले आहे तेव्हांपासून निर्माण झाली आहे. शेतकर्यांच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काढणे अत्यंत आवश्यक असल्याने या संदर्भात व विविध मागण्याच्या अनुषंगाने दि.११ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री, विविध खात्याचे मंत्री व सचिवासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीमध्ये शिष्टमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना शेतकर्याचे नुकसान होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्या, स्वयंचलित गेट काढून नैसर्गिक सांडवा निर्मिती करणेबाबच्या सूचना नगरपालिका बुलढाणा यांना दिल्या होत्या. मात्र अनेक महिने उलटूनसुद्धा या विषयाच्या अनुषंगाने बुलढाणा नगरपालिकेकडून कायमस्वरूपी उपाययोजना होतांना दिसत नसल्याने व कार्यवाही करण्यात आली नसल्याने व त्याचप्रमाणे यावर्षीचे हवामान खात्याचे अंदाजाप्रमाने पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार असल्याने, मागीलवर्षी प्रमाणे सन २०२५ मध्येसुद्धा तीन तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्याचे शेतीपिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, शेतकर्यांचा जो अनुभव आहे तो जाणून घेऊन सांडवा तयार करण्यात यावा, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, विलास वसू, नितीन शेळके, सतिष सुरडकर, राहुल पवार, ज्ञानेश्वर झगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशही प्रशासनाने पायदळी तुडवले?
चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनीदेखील विविधप्रश्नी तत्कालीन उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक मंत्रालयात घेतली होती. या बैठकीत फडणवीस यांच्यासमोर इतर प्रश्न मांडण्यात आले असता, त्यात येळगाव धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचाही प्रश्न मांडण्यात आला असता, या बैठकीला जिल्हाधिकारी हे ऑनलाईन हजर होते. तेव्हा फडणवीस यांनी स्वयंचलित दरवाजे हटविणेसंदर्भात नगरपालिकेला कारवाईचे निर्देशही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले होते. त्या आदेशाचेही अद्याप पालन झाले नसल्याचे दिसून येत आहे.