मिसाळवाडीचा सुपुत्र अनिकेत भगत याचा पनवेलमध्ये धरणात बुडून मृत्यू!

admin 2 Min Read
2 Min Read

– सुकापूर (ता. पनवेल)सह मिसाळवाडी गावावर शोककळा
– धरणात पोहण्यास जाणे जीवावर बेतले; भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला!

पनवेल (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुकापूर येथील भगतवाडी येथील अनिकेत किसन भगत या वीस वर्षीय तरूणाचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील मिसाळवाडी (ता. चिखली) येथील रहिवासी होता. नवी मुंबईतील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयात ते काॅम्पुटर इंजिनिअरिंगच्या तिसर्या वर्षाला शिकत होता. या दुर्देवी घटनेने मिसाळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

आज, बुधवारी (दि.३०) परीक्षा संपल्यावर अनिकेत भगत हा काही मित्रांसोबत मोरबे धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, सर्व मित्र पाण्याबाहेर असताना अनिकेत हा एकटाच धरणात पोहोण्यासाठी उतरला. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा दुर्देवीरित्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती सोबतच्या मित्रांनी खालापूर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह पोलिस पथक हे धरणस्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अपघातग्रस्त टीमचे प्रमुख गुरूनाथ साठेलकर यांना माहिती दिली. अपघातग्रस्त टीमने शोधमोहीम राबवून सायंकाळी ५.४५च्या दरम्यान अनिकेतचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी चौक ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला व शवपरीक्षण झाल्यानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री 11.30 वाजता अनिकेतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्देवी घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार हे करीत आहेत.


अनिकेत हा मूळचा मिसाळवाडी, ता. चिखली येथील रहिवासी होता. त्याचे वडिल किसन भगत हे बरेच वर्षांपूर्वी पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे राहण्यास आले होते. या दुर्देवी घटनेने मिसाळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तरूण पोरगा गेल्याने भगत कुटुंबीयांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्री साडेअकरा वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Share This Article
Exit mobile version