लव्हाळा येथील पुलाचा प्रश्न गडकरींच्या कानावर!
जिल्ह्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट, पुन्हा करण्यात यावीत
बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भारतमाला योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या महामार्गातील जालना-नागपूर आणि मुंबई-नागपूर या महामार्गाचे तीन पदरीकरण करण्यात यावे. आणि, या महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी केली.
दिल्ली येथील परिवहन भवन येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवुन खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या दृष्टिकोनातून विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये मलकापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे, मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग 6 हा बुलडाणा जिल्ह्यातून जात असून, मलकापूर येथील चिखली रणथम ते खामगाव बाळापुर हद्दीपर्यंतच काम हे अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामांना गती देण्यात यावी आणि या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम त्वरीत पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार प्रतापतराव जाधव यांनी यावेळी केली. शिवाय, आदिवासी बहुल भाग असलेल्या संग्रामपूर, जळगाव जामोद ते बुलढाणा मुख्यालय जोडणाऱ्या नांदुरा रेल्वे गेट वर उड्डाणपूलच काम त्वरित सुरू करावे, कारण या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रेल्वेची वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहनधारकांना ताटकळत बसावे लागते. ही समस्या निकाली काढण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. या रेल्वे पुलाचे काम त्वरित सुरू करून लोकांची गैरसोय टाळावी , अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
भारतमाला योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली जालना-नागपूर व्हाया सिदखेडराजा, मेहकर, कारंजा, नागपूर आणि मुंबई-नागपूर व्हाया घोटी, सिन्नर, वैजापूर, संभाजीनगर, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा, नागपूर या महामार्गाचे सुद्धा तीन पदरीकरण करावे, अशी मागणी खासदार जाधव यांनी केली आहे. जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची उंची अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात संबंधित प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून काम करावे. अशी मागणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे. या सर्व मागण्यांना मंत्री गडकरी यांनी सकारात्मक दृष्टीकाेन दाखवला आहे.

