– आरक्षण सोडतीत सरपंचपदासाठी ४९ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव
– इच्छुक उमेदवारांना लागले सरपंचपदाचे डोहाळे!
– आता राजकीय डाळी शिजवण्यासाठी गावोगावी पेटणार भट्ट्या!
चिखली (प्रताप मोरे) – तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण दि.१६ एप्रिलरोजी जाहीर करण्यात आले होते. परंतु ५० टक्के जागा या महिलांसाठी राखीव असल्याने या आरक्षणानुसार, ९९ पैकी ४९ ग्रामपंचायतीच्या राखीव महिला सरपंचपदाचे आरक्षण आज (दि.२५) जाहीर करण्यात आले. तालुक्यातील ९९ पैकी अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता २१ सरपंचपदे राखीव असून, त्यापैकी ११ महिलांसाठी आहेत, अनुसूचित जमातीकरिता ३ राखीव असून, २ महिलांसाठी आहेत, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता २६ आरक्षित असून, त्यापैकी १३ महिलांसाठी राखीव आहेत, एकूण आरक्षणातील ४९ सरपंचपदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित असून, त्यापैकी २४ सरपंचपदे महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींवर आता महिलाराज अवतारणार आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयाची अधिसूचना दिनांक ०५ मार्च २०२५ नुसार तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमचे कलम ३० (४) (५) अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार सन २०२५ ते २०३० साठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. चिखली तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीव्दारे गठीत होणार्या ९९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण दि. १६ एप्रिलरोजी तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले होते. आणि ५० टक्के आरक्षणानुसार राहिलेल्या ४९ ग्रामपंचायतीच्या राखीव महिला सरपंचपदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आल्याने यापुढील सरपंचपदाच्या निवडणुकांत हे आरक्षण लागू राहणार आहे. सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून केली जात असल्याने या आरक्षण सोडतीला महत्व प्राप्त झालेले आहे. अनेक गावांत इच्छुकांचा हिरमोड झाला असून, ज्या गावांत आरक्षण सोडत महिलांसाठी निघाली नाही, त्या गावांत आता राजकीय डाळी शिजविण्यासाठी भट्ट्या चांगल्याच पेटणार आहेत. विशेष म्हणजे, चिखली तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वांच्या गावांतील आरक्षण सोडत, पुरुषांसाठी राखीव निघाल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, इच्छुक कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

