– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले, सुरक्षा यंत्रणा हायअॅलर्टवर!
– हल्लेखोरांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधान मोदींनी ठणकावले!
– दक्षिण काश्मीरमधील टुरिस्ट लोकेशन असलेल्या पहलगाम येथील नृशंस हत्याकांड
श्रीनगर (प्रतिनिधी) – पर्यटनासाठी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे आलेल्या पर्यटकांचे नाव व धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या. पहलगाम हे ‘मिनी स्विर्त्झलंड’ मानले जात असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. आज (दि.२२) दुपारी तीन वाजता हे नृशंस हत्याकांड घडवून हल्लेखोर पळून गेले. बैसरन घाटी येथे झालेल्या या निरपराध व निशस्त्र नागरिकांच्या हत्याकांडात अनेकजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हे वृत्त लिहिपर्यंत २९ पर्यंटक ठार झाले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. या नृशंस हत्याकांडाची माहिती मिळताच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तातडीने काश्मीरमध्ये पोहोचले. तर हल्लेखोरांना सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदी राजवटीत दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच सामान्य नागरिकांचे एवढे मोठे हत्याकांड घडवले आहे. या हत्याकांडाचा सर्व राजकीय पक्षांसह देशविदेशातून तीव्र निषेध केला जात आहे.
आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन
जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले असतील, तर त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष तसेच तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष क्रमांक – ०७२६२ २४२६८३/ ७०२०४३५९५४
तसेच जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष – ०७२६२ २४२४००

