– आठ वर्षांत सोन्याचे भाव तिप्पट; आजचे भाव लाखाच्या घरात; चांदीही चकाकली!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – आठ वर्षांत सोन्याचे भाव तिपटीने वाढल्याचे दिसून येत असून, चांदी ही चांगलीच चकाकल्याचे दिसून येत आहे. राज्यात रजतनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या खामगाव शहरात आज, दि. २२ एप्रिल रोजी सोन्याचा भाव प्रती तोळा ९९ हजार असून, चांदीही ९८ हजार प्रतिकिलोचे वर भाव असल्याचे सांगितले जात आहे. तर राज्यात काही ठिकाणी सोन्याचे भाव लाखाच्या वर प्रतितोळा होता. तर ऐन लग्नसराईत सोने महागल्याने वधुपित्यांसमोर मोठेच आर्थिक संकट कोसळले आहे.
ट्रम्पनीती अर्थात अवाजवी लावलेल्या करामुळे भाववाढ सुरु असून अमेरिकेत तर परिस्थिती फारच अस्थीर आहे. पुढील काही दिवस भावाची हीच परिस्थिती राहणार आहे. यामुळे विशेषतः गेल्या दोन दिवसात सोन्याला ग्राहकीच नाही.
– मनोज शहा, जिल्हाध्यक्ष, सराफा असोसिएशन बुलढाणा
सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, सोन्याच्या दरात रात्रीतून पुन्हा १५००-१८०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर ९९००० रुपये झाले आहेत. तर जीएसटीसह हेच सोन्याचे दर १०२००० रुपये इतके झाले आहेत. अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि चायनामधील ट्रेड वॉर सोन्याच्या किंमती वाढीस कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, काहीच दिवसांवर अक्षय तृतीया असल्यानेदेखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर लग्नसराई असल्याने सोने महाग झाले तरी खरेदी करताना दिसत आहेत.
