– लोणार तालुक्यात पीकविम्याचा सावळा गोंधळ! – उर्वरित शेतकर्यांना लवकरात लवकर पीकविमा द्या अन्यथा आंदोलन; लोणार तालुका कृषी अधिकार्यांसह पीकविमा प्रतिनिधीला लाड यांचा इशारा
बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यात २०२३- २०२४ चा खरीप व रब्बी हंगामाचा पीकविमा काही शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाला आहे, तर काही शेतकरी आजही पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत. तरी उर्वरित शेतकर्यांच्या खात्यात लवकरात लवकर पीकविम्याची रक्कम जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी लोणार तालुका कृषी अधिकारी व विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी यांची समक्ष भेट घेऊन दिला.
तालुक्यात काही शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम योग्य प्रमाणात आली तर काही शेतकर्यांच्या खात्यावर अत्यंत कमी प्रमाणात ही रक्कम आली आहे. आजही काही शेतकर्यांना पीकविमा आला नाही. त्यासंबंधी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी लोणार तालुका कृषी अधिकारी व विमा प्रतिनिधी यांची भेट घेऊन पीकविमापासून वंचित असलेल्या शेतकर्यांच्या पीकविमासंबंधी चर्चा केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी व विमा प्रतिनिधी यांनी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत चर्चा केली व लवकरच पीकविम्याची रक्कम शेतकर्यांना मिळणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी पीकविम्याची रक्कम लवकर शेतकर्यांना न मिळाल्यास लोणार तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सहदेव लाड यांनी दिला. यावेळी अनिल लांडगे, संजय महाजन व इतर शेतकरी उपस्थित होते.