कर्जबाजारी तरूण शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या!

admin 1 Min Read
1 Min Read

– पळसखेड दौलत येथील संतोष गायकवाडने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

चिखली (महेंद्र हिवाळे) – सततची दुष्काळी परिस्थिती, शासनाचे नाकर्ते धोरण यामुळे शेतकरी मेताकुटीला आला असून, त्यामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्येची पाळी आली आहे. सततची नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व कर्जदारांनी लावेला तगादा यामुळे तालुक्यातील पळसखेड दौलत येथील युवा शेतकरीपुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संतोष गायकवाड (वय २४) असे या तरूण शेतकर्‍याचे नाव असून, कुटुंबाच्या डोक्यावर झालेले शेतीचे कर्ज पाहाता, हतबल झाल्यानेच त्याने जीवनयात्रा संपविल्याचे सांगण्यात येत आहे.

संतोष गायकवाड यांच्या कुटुंबीयांकडे शेती असून, शेतीवरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, सततची नापिकी, मोठे नुकसान होऊनही कमी मिळालेला पीकविमा, डोक्यावर असलेले शेती व खासगी कर्ज यामुळे वडिलांसह संतोष हा हवालदिल झाला होता. संतोष हा आई-वडिलांसह शेतात काम करून घर खर्चाला हातभार लावत होता. परंतु, न परवडणारी शेती व कुटुंबाच्या डोक्यावर असलेले कर्ज यामुळे तो नैराश्यात गेल्याने आज (दि.२२) सकाळी त्याने टोकाचे पाऊल उचलत, सकाळी ११ वाजेच्या सुमारास आई-वडिल व कुटुंबीय शेतात गेल्याचे पाहून, त्याने राहत्या घरातच गळफास घेतला. या दुर्देवी घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच, तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. संतोष यांच्या आई-वडिलांचा आक्रोश पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळले होते. या घटनेने गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

Share This Article
Exit mobile version