– देऊळगावराजा येथील आपत्कालीन बैठकीत आखली रणनीती! – ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा पाठपुरावा व संतोष भुतेकर यांच्या जलसमाधीच्या इशार्यानंतर प्रशासन सतर्क! – वाळूतस्करी रोखण्याचे स्पष्ट निर्देश; सहकार्य न करणार्या सरपंच, पोलिस पाटलांवर निलंबनाची कारवाई होणार!
देऊळगावराजा / सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – खडकपूर्णा प्रकल्पातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर रेती उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाईचा इशारा दिला आहे. युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी अवैध रेती उपशावर तातडीने कारवाई न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिल्यानंतर, तसेच ब्रेकिंग महाराष्ट्रने हा प्रश्न राज्यस्तरावर उचलून धरल्यानंतर, प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या आदेशानुसार आज (दि.२१) दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय देऊळगावराजा येथे आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली. महसूल, पाटबंधारे, पोलिसस, वन आणि परिवहन विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत खडकपूर्णा धरण व नदीतून चालणारी वाळूतस्करी रोखण्यासाठी रणनीती आखण्यात आली.
खडकपूर्णा नदी व धरणातून चालणारी वाळूतस्करी हा गंभीर प्रश्न बनला असून, याप्रश्नी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारादेखील दिला होता. त्यानुसार, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी आज आपत्कालीन बैठक घेऊन ही वाळूतस्करी रोखण्याची रणनीती निश्चित केली. त्यानुसार, काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने, प्रकल्पातील सर्व अवैध बोटी तातडीने नष्ट करणे, रेती उपसा व वाहतूक तात्काळ थांबवणे, रेती तस्करांविरुद्ध स्थानिक वाळू दक्षता समितीच्या माध्यमातून पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करणे, अवैध उत्खननावर संबंधित सरपंच, पोलिस पाटील, तलाठी व मंडळ अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करणे, सहकार्य न करणार्या सरपंच व पोलिस पाटलांवर अपात्रता व निलंबनाची कारवाई करणे, वनविभागाच्या हद्दीतून उत्खनन करणार्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे, विनानंबर प्लेटच्या अवैध वाहतुकीवर परिवहन विभागाची कठोर कारवाई करणे यांसह गस्त पथकांकडून झालेल्या हलगर्जीवरही कारवाईचे निर्देश यावेळी देण्यात आले. तहसीलदार देऊळगावराजा यांच्या आदेशानुसार अवैध रेती उपसा व वाहतूक रोखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीत जवळपास पावणेदोन तास सांगोपांग चर्चा झाली. खडकपूर्णा प्रकल्पातील रेतीमाफियांवर पोलिस कारवाईसाठी वाळू दक्षता समितीच्या नावाने तक्रार दाखल करण्याचे निश्चित झाले आहे. प्रशासनाने सर्व यंत्रणांना समन्वयाने कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले असून, कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र होण्याचा इशारा संतोष भुतेकर यांनी दिला आहे. या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी बुलढाणा व उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.